सध्या देशातील अनेक राज्ये बरखास्त करण्याचा प्रयत्न होत आहे. सत्ता केंद्रीत करण्याचा हा प्रयत्न ताकद देणारा असला तरी, जनता त्याचे निरीक्षण करीत आहे. जनता बोलत नाही, ती बघत असते. त्यामुळे आज ना उद्या ही सत्ता बरखास्त केल्याशिवाय ती शांत राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केली.
हा सत्तेचा दोष आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राज्य कार्यकारिणीची बैठक मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या वेळी बोलताना पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीवर हल्ला करण्याचे काम भाजप करत आहे. आधी मध्यप्रदेश आणि आता महाराष्ट्र. लोकशाही मार्गाने आलेल्यांना बाजूला करून सत्ता आपल्या हातात कशी राहील, याचा प्रयत्न केला जात आहे. हा सत्तेचा दोष आहे. सत्ता केंद्रीत झाली, तर ती एका हातात जाते. त्यामुळे सत्ता विकेंद्रित झाली पाहिजे. ईडी, सीबीआय या अगोदर कधी माहित नव्हत्या, त्या अलीकडे आल्या आहेत. ईडीचा काँग्रेसकडून कधी वापर झाला नाही. मात्र आता सत्तेचा वापर करून राजकीय दहशत निर्माण केली जात आहे. त्यामुळे सर्वांसाठी हा संघर्षाचा काळ आहे, असेही पवार यांनी सांगितले.
येत्या काळात वेगळे चित्र पहायला मिळेल
१९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले होते. आज ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये शिवसैनिक कुठेही हलला नाही. ज्यांनी सत्ता बदल करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात हा शिवसैनिक एकत्र झाला आहे. एखाद् दुसरा सोडला, तर एकही जण निवडून येणार नाही, हे मला शिवसैनिक सांगत आहेत. हे सत्तापरिवर्तन लोकांना आवडलेले नाही. शिवसैनिक नाराज आहेत. त्यामुळे एक वेगळे चित्र राज्यात आगामी काळात पाहायला मिळेल, असेही पवार म्हणाले.
जोमाने काम करा
पाऊस कमी झाल्यावर आपल्याला अडीच वर्षे जोमाने काम करायचे आहे. लोकांशी संपर्क करायचा आहे, त्यांच्या अडचणी जाणून घेवून, रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. पक्ष संघटना म्हणून आपल्याला कष्ट करायचा हा कालखंड आहे. पक्षाची स्थापना झाल्यापासून २३ वर्षांच्या कालखंडात, साडेसतरा वर्षे सत्तेत राहीलो. त्यातील देवेंद्र फडणवीस यांचा कालखंड सोडला, तर जास्त काळ भाजप सत्तेत नव्हता. आपण सत्ता बघितली आणि सत्ता नसलेला काळही बघत आहोत. त्यामध्ये मला समाधानाचा काळ हा विरोधात असतानाचा वाटतो, असेही पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी १ नंबरवर नेऊया…
ओबीसी समाजाला घेऊन निवडणूका झाल्या पाहिजेत, ही पक्षाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे ही एक संधी आपल्याला आली आहे. आगामी नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकांत नेतृत्वाची फळी तयार करण्यासह सर्व घटकांना न्याय कसा देता येईल, याचा विचार झाला पाहिजे. यावेळी ५० टक्के तरुण पिढीला संधी द्या. त्यांच्यामागे खंबीरपणे उभे रहा. हीच पिढी आपल्या पक्षाच्या पाठीशी उभी राहिल. असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे ५४, शिवसेनेचे ५६, तर काँग्रेसचे ४४ आमदार अशी स्थिती सत्तेत असताना होती. आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरवर कसा जाईल, याचा प्रयत्न करुया. इतर पक्षांमध्ये फाटाफूट झाली. पण राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही याबद्दल पवार यांनी समाधान व्यक्त केले.