शरद पवार (Sharad Pawar) ४ वेळा मुख्यमंत्री झाले, पण मराठा समाजाची माती केली. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले. मराठ्यांचे नेते म्हणून मिरवले. पण मराठा समाजाची त्यांनी मातीच केली. दोनदा मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम एकदा देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, या शब्दांत सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल केला.
विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी झाला. विधान परिषदेवर निवडून आलेले सदाभाऊ खोत यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. शेतीच्या बांधावरुन मला विधानभवनाच्या बांधावर उभे केले. मी भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. मी सर्व शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. माझ्या या पदाचा उपयोग हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब जनता, कष्टकरी वर्ग आणि माझ्या बळीराजाच्या उन्नतीसाठी करेन, अशी गॅरंटी सदाभाऊ खोत यांनी दिली. तसेच मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ असेल, सारथी सारखी संस्था असेल त्या माध्यमातून २० विद्यार्थी युपीएसीमध्ये आले. अशा अनेक योजना मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय दृष्टीकोणातून न पाहता, राज्यातील ओबीसी आणि मराठा समाज गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.
(हेही वाचा Award Ceremony : ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांचा शिवसन्मान पुरस्काराने गौरव)
मनोज जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. कायदे तज्ज्ञांना सोबत घेऊन एक चांगला मार्ग काढू. हा मार्ग महाराष्ट्राच्या हिताचा असेल. कोणतही आंदोलन चालवत असताना सरकार आपल्याशी बोलत नसेल तर आंदोलन आक्रमक करायचे असते, सरकार आपल्याशी बोलत असेल तर संवाद आणि चर्चा करावी. यातून मार्ग निघेल. पण आंदोलन कुठे थांबवायचे हे जर समजले तर ज्यांच्यासाठी आंदोलन करतो त्यांना न्याय मिळतो, असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला.
Join Our WhatsApp Community