सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, ११ मे रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, तत्कालीन राज्यपाल यांच्यावर ताशेरे ओढत, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा ठाकरेंचे सरकार आले असते, असे महत्त्वाचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवत निकाल दिला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया देऊन उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याबाबत आता चर्चेला काहीच अर्थ नाही, असे म्हटले आहे.
एकबाजूला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाचे वाचन होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात बिहाराचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवार बोलत असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार म्हणाले की, ‘काही निर्णय अजून व्हायचे आहेत, असे मला वाटते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यकर्त्यांविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. राज्यपालांची भूमिका कशी चुकीची होती हे न्यायालयाने नोंदवले आहे. राजपालांच्या चुकीच्या भूमिकेचे उत्तम उदाहरण महाराष्ट्राने पाहिले आहे. पण आता तत्कालीन राज्यपाल नसल्यामुळे फार चर्चेला अर्थ नाही. तसेच आता उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत चर्चेला काहीच अर्थ नाही. मी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातून राजीनाम्यासंदर्भात सविस्तर लिहिले आहे. काही जण मी मांडलेल्या भूमिकेवर नाराज झाले होते. यावर आता चर्चेला काही अर्थ नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्रित जोमाने काम करू.’
हेही पहा –
Join Our WhatsApp Community