सध्याच्या काँग्रेसची अवस्था ही रया गेलेल्या मोठ्या हवेलीच्या जमीनदारासारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात अशा हवेलीचा जमीनदार रोज सकाळी उठतो तेव्हा आजूबाजूचे हिरवेगार शिवार पाहून म्हणतो हे सगळे माझे होते, आता नाही. अशीच काहीशी अवस्था सध्याच्या काँग्रेसची झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाचे वर्णन केले.
काँग्रेस नेते नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेत नाही!
‘इंडिया टुडे ग्रुपचे मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’चे पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने ‘मुंबई तक’ला विशेष मुलाखत देताना शरद पवार बोलत होते. काँग्रेसची नेतेमंडळींना राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे वाटत आहे. त्यावर बोलताना पवार यांनी, ‘काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत नसतात’, असे म्हटले आहे.
(हेही वाचा : ‘ब्रिक्स’मध्ये अफगाणिस्तानवर चर्चा! काय म्हणाले व्लादिमीर पुतीन?)
काँग्रेसने सध्याची अवस्था मान्य केली तर फायदा!
उत्तर प्रदेशमध्ये जमीनदार आहेत, त्यांच्याकडे मोठी शेती आहे. गावामध्ये त्यांच्याकडे हवेली असते. लँड सिलिंगचा कायदा आला आणि त्यांच्याकडच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण त्या हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरांवर आली. सकाळी जमीनदार उठतो आणि हवेलीच्या बाहेर जाऊन बघतो. त्याला आजूबाजूला हिरवं पिक दिसतं, तेव्हा तो हे सर्व हिरवं पिक माझं होतं, असं सांगतो. माझं होतं, आता नाही. यावरच पवारांना काँग्रेसची अवस्था ही ओसाड गावच्या पाटलासारखी झालीय का? असे विचारण्यात आले. तेव्हा पवार म्हणाले, तितकं काही मी म्हणत नाही. एकेकाळी काँग्रेस काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत होती. पण ती होती, आती नाही. होती हे मान्य केले पाहिजे. मग अन्य विरोधी पक्ष जवळ येण्याची प्रक्रिया सुरू होईल, असेही पवार म्हणाले.
Join Our WhatsApp Community