मुंबई – २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीमागे शरद पवारच होते, हे आता उघड झाले आहे. स्वतः शरद पवार यांनी त्याची कबुली दिली असून, गुगली कशी टाकायची, हे मला चांगलेच माहित आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. ‘शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार यावे म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता’, असा दावा या मुलाखतीत फडणवीस यांनी केला. याविषयी पुण्यातील पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता, पहाटेच्या शपथविधीपूर्वी आमची बैठक झाली होती, अनेक विषयांवर आमची चर्चाही झाली होती, असे सांगत त्यांनी फडणवीसांच्या दाव्याला दुजोरा दिला.
पवार म्हणाले, पहाटेच्या शपथविधीपूर्वी फडणवीस मला भेटले हे खरे आहे. त्यांनी अनेक गोष्टींची चर्चा केली हेही खरे आहे. पण, त्यांनी स्वत:च काल सांगितले की, याबाबतचे धोरण मी (पवारांनी) दोन दिवसांनी बदलले. मग, जर दोन दिवसांनी मी धोरण बदलले असेल तर, त्याच्या दोन दिवसांनंतर शपथ घ्यायचे काय कारण होते? शपथ घ्यायची होती तर अशी चोरून का घेतली पहाटे? त्यांना पाठिंब्याची खात्री होती तर दोन दिवसांत सरकार का पडलं? दोन दिवसांत त्यांची सत्ता गेली. त्यांना राजीनामा द्यावा लागला.
(हेही वाचा – कॅबिनेट मंत्रीपद द्या, अन्यथा स्वतंत्र लढू; महादेव जानकरांचा भाजपाला इशारा)
सत्तेसाठी आम्ही कुठेही जाऊ शकतो, ही जी त्यांची पावलं होती ती पावलं एकदा समाजाच्या समोर यावीत या दृष्टीने काही गोष्टी केलेल्या होत्या. आम्ही सत्तेसाठी किती अस्वस्थ आहोत, त्याच्याशिवाय आम्ही कसे पुढे जाऊ शकत नाही, जगू शकत नाही. ही त्यांची अस्वस्थता एकदा महाराष्ट्रासमोर येण्याची आवश्यकता होती. मी आयसीसीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे क्रिकेट खेळलो नसलो, तरी गुगली कसा टाकायचा आणि कुठे टाकायचा हे मला माहिती आहे. विकेट गेलेला माणूस विकेट गेली म्हणून सांगतो का? विकेट दिली, तर ती सोडणार कशी?, अशा शब्दांत शरद पवार यांनी पहाटेच्या शपथविधीमागची कहाणी सांगितली.
पवारांच्या तोंडून शेवटी सत्य बाहेर आले – फडणवीस
मला अतिशय आनंद आहे, की शरद पवारांच्या तोंडून शेवटी सत्य बाहेर आले. मी जी गुगली टाकली त्यामुळेच हेच सत्य बाहेर आले आहे, पण ते अर्धेच आले आहे. अजून उरलेले सत्यही मी बाहेर काढीन. त्यांच्या गुगलीमुळे मी बोल्ड व्हायच्याऐवजी त्यांचे पुतणे अजित पवार हेच बोल्ड झाले आहेत, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या विधानावर दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community