गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, या प्रकरणाची एक सक्षम चांगल्या अधिकाऱ्याकडून चौकशी झाली पाहिजे, या प्रकरणी देशमुख यांची बाजू समजून घेणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यांची बाजू समजून घेऊ, त्यानंतर सोमवार, २२ मार्च रोजी निर्णय घेऊ, असे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
फडणवीस दिल्लीत आल्यावर हे पत्र दिले!
तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिलेल्या पत्राचे दोन भाग आहेत, त्यात एक पैशाचा विषय आहे, तर दुसरा भाग हा मोहन डेलकर यांचे प्रकरण आहे. या पत्रात परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले, त्यानंतर हे पत्र देण्यात आले आहे. मला कुणावरही आरोप करायचा नाही, पण परमबीर सिंग हे पदावर असताना त्यांनी हे आरोप केले नाही, पदावरून हटवल्यावर त्यांनी हे आरोप केले आहेत.
सरकार स्थिर!
या प्रकरणी सरकार पाडण्याचा प्रयत्न होणारच, विरोधी पक्षाचे हे काम आहे. मात्र त्याचा सरकारवर परिणाम होणार नाही, राज्याचे सरकार स्थिर आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
(हेही वाचा : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात पहिली अटक! दोघे गजाआड, एक हवालदार!)
आपण फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलणार!
या प्रकरणी मी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीच बोलतो अन्य कुणाशी बोलत नाही, आज पत्रकार परिषद घेण्याआधीच मी मुख्यमंत्र्यांशी बोललो होतो. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. आरोपही गंभीर आहेत. मात्र सचिन वाझे यांना परमवीर सिंग यांनीच सेवेत घेतले आहे. या प्रकरणी मीडियाकडून मुंबई पोलिसांवर आरोप होत आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी एक सक्षम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झाली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे!
- गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत
- परमबीर यांच्या पत्राचे दोन भाग
- देशमुखांवर केलेले आरोप गंभीर आहेत
- हे पत्र धक्कादायक आहे
- त्या पत्रावर परमवीर सिँग यांची स्वाक्षरी नाही
- 100 कोटी वसुलीचे आरोप गंभीर
- परमबीर यांच्याशी माझी भेट झाली होती
- वाझेंना पोलीस सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय परमवीर सिंग यांचाच
- मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा निर्णय नाही
- पत्रात लिहिले नाही पैसे कसे दिले गेले ते
- बदलीनंतर परमबीर सिंग यांच्याकडून झाले आरोप
- पदावर असताना आरोप केले नाहीत
- हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे
- पोलीस खात्याकडून आरोप केले आहेत
- मीडियाकडूनही मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करत आहे
- त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे
- मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा
- चौकशीचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे
- उत्तम अधिकाऱ्यांकडून या आरोपांची चौकशी व्हावी
- सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही
- मी या प्रकरणी फक्त मुख्यमंत्र्यांशी बोलणार, अन्य कुणाशी बोलणार नाही
- सरकार पडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण त्याचा परिणाम होणार नाही
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यासोबत बैठक आहे
- फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर हे पत्र समोर आले आहे
- या प्रकरणी अनिल देशमुख यांचेही म्हणणे ऐकून घेणे हे आमचे कर्तव्य आहे
- ते ऐकून घेतल्यानंतर उद्या आम्ही निर्णय घेऊ