केंद्रीय तपास यंत्रणांमुळे सरकार बेजार! मुख्यमंत्र्यांना भेटले शरद पवार

केंद्रीय तपास यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याकरता रणनीती काय असावी यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

72

सध्या सरकारमधील एकामागोमाग एक अशा मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागला आहे. आता तपास यंत्रणा थेट शरद पवारांच्या घरात घुसल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये चांगलीच अस्वस्थता वाढली आहे. याच तपास यंत्रणांनी आधीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मागे लागलेल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा याकरता एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट वर्षा बंगला गाठला. त्यांच्यासोबत अर्धा तास चर्चा केल्याचे समजते.

सेना-एनसीपीमध्ये अधिक अस्वस्थता

महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये विशेष करून शिवसेना आणि एनसीपीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. म्हणून सध्या या दोन्ही पक्षांमध्ये अधिक अस्वस्थता आहे. म्हणून यावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली आहे. आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. मात्र त्याकरता रणनीती काय असावी याकरता शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा : आर्यनचे ‘खान’पान कोठडीतच… जामीन अर्ज फेटाळला)

सोमय्यांची अजित पवारांच्या विरोधात तक्रार दाखल

दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्री व्यवहाराविरोधात पुरावे देण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी ईडीकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचे पुरावे ईडी आणि आयकर विभागाला दिले. याप्रसंगी किरीट सोमय्या हे ईडी कार्यालयात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात 20 ते 25 कार्याकर्त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.