मागील काही दिवसांपासून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वड्डेट्टीवार, संजय राऊत आणि बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर टीका केली. त्या टीकेला उत्तर देतांना शरद पवार यांनी ‘आमदार म्हणजे पक्ष नव्हे; राष्ट्रवादीत फूट नाहीच’ असे म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) पक्षात फूट नाहीच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज म्हणजेच शनिवार २६ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. तसेच, काही आमदारांनी वेगळी भूमिका मांडली म्हणून पक्ष फुटला असे म्हणता येत नाही. कारण पक्ष म्हणजे आमदार नव्हे, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.
(हेही वाचा – Onion Buying Center : राज्यात १६ ठिकाणी नाफेडची कांदा खरेदी केंद्र सुरु)
राऊत, वडेट्टीवारांच्या टीकेवर प्रतिक्रिया
राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष आहेत, ही फूट नाही तर काय? असा सवाल काँग्रेस नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. तर, संजय राऊत यांनीही अजित पवार गटाने पक्षाच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची (Sharad Pawar) हकालपट्टी केली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षातही शिवसेनेप्रमाणे फुट पडली असल्याचे आम्ही मानतो, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर “मी राष्ट्रवादीचा प्रमुख आहे. माझ्या पक्षाचे धोरण मी सांगतो,” अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी सुनावले आहे. तसेच, राष्ट्रवादीत फूट असल्याचा दावाही त्यांनी पुन्हा फेटाळून लावला.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, पक्ष म्हणजे काय? फूट याचा खरा अर्थ काय? हे तुम्ही समजावून घ्या. पक्ष म्हणजे आमदार नव्हे तर पक्ष ही संघटना असते. देश पातळीवर ज्याच्या हाती पक्षाची संघटना पक्ष त्याचा. आता राष्ट्रवादी पक्ष, संघटनेचे अध्यक्ष इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत. देशाच्या संघटनेचे अध्यक्ष तुमच्यासमोर आहेत. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहे.
पक्षाचा अध्यक्ष मीच
शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, आमच्यापासून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी फक्त पक्षाच्या विचारसरणीहून वेगळी भूमिका घेतली असे म्हणता येईल. ते आमदार काही पक्षातून फुटून गेले नाहीत. तुम्हीच आठवून बघा तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात? तसेच, आमचे काही सहकारी आम्हाला सोडून गेले तेव्हा त्यांची पहिली पत्रकार परिषदही आठवून पाहा. पक्षाचा अध्यक्ष शरद पवार असल्याचेच त्यांनी सांगितले होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community