२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप-शिवसेना युती फोडून शिवसेनेला सोबत घेऊन दोन्ही काँग्रेससह महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते आणि सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसवले. ज्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील राजकीय शत्रुत्व वाढले. असे असतानाही राष्ट्रवादीसोबत भाजप नागालँड येथे चक्क सरकार स्थापन करणार आहे.
सगळेच पक्ष सत्तेत; विरोधी पक्षच नाही
नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निकालात एनडीपीपी आणि भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील २ पक्षांनीही जागा पटकावल्या. त्यात रामदास आठवलेंच्या आरपीआयने २, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला. एकीकडे देशात विरोधी पक्षांचे ऐक्य व्हावे यासाठी सातत्याने शरद पवार पुढाकार घेत आहेत. तर दुसरीकडे नागालँडमध्ये राष्ट्रवादीने घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी- भाजपा सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. या राज्यात सरकारच्या स्थिरतेला कुठलाही धोका नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आज सकाळी नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार असल्यावर शिक्कामोर्तंब करण्यात आले. नागालँडमध्ये राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष बनला आहे. त्यात राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिल्याने आता विरोधात एकही पक्ष नाही.
Join Our WhatsApp Community