Ratan Tata Death : “संकटांवर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात…”, रतन टाटा यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून श्रद्धांजली

151
Ratan Tata Death :
Ratan Tata Death : "संकटांवर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात...", रतन टाटा यांच्या निधनानंतर शरद पवारांकडून श्रद्धांजली

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata Death) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी ( 7ऑक्टोबर) नियमित तपासणीसाठी रतन टाटा (Ratan Tata Death) रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी व कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय रतन टाटांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच ज्येष्ठ नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवारांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. खासदार सुळे म्हणाल्या, “टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. भारतीय उद्योगविश्वात रतन टाटा हे नाव विश्वास आणि औदार्याचे प्रतीक होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी टाटा उद्योगसमूहाची मूल्ये कायम राखली. त्यांच्या निधनामुळे समाजाप्रती आपले उत्तरदायित्व मानणारा उमद्या मनाचा उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.