शिवसेनेत लेटरबॉम्ब, पवारांची दिल्लीत खलबते

122

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना, आता दिल्लीत पवारांची देखील खलबते सुरू झाली आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या दिल्लीत असून, सोमवारी त्यांनी प्रशांत किशोर यांच्यासोबत जवळपास पावणे दोन तास चर्चा केली. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यामध्ये राज्यातील राजकारणासोबतच राष्ट्रीय राजकारणाबाबत देखील खलबते झाल्याची माहिती मिळत आहे.

मंगळवारी दिल्लीत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्य समितीची बैठक मंगळवारी २२ जून दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे.

(हेही वाचाः आता पवारांची दिल्लीवारी… काय आहे रहस्य?)

किशोर यांची पुन्हा घेतली भेट

संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम मंगळवारपासून शरद पवार करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले. तसेच राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी प्रशांत किशोर यांनी भेट घेतली असून, या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची त्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध होती, ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मंगळवारी मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून, त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्या बाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आता राष्ट्रमंचची स्थापना होणार?

भाजप विरोधात एकत्र येण्यासाठी यूपीएच्या बॅनरखाली एकत्र येण्याऐवजी नवे बॅनर घेऊन एकत्र येण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. यूपीए फेल गेल्याने राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र आल्यास भाजपला धक्का देणे सोपे जाईल. या नव्या बॅनरच्या माध्यमातून देशभरातील जनतेला आकर्षित करणे सोपे जाईल, असे काही नेत्यांचं मत असल्याने राष्ट्रमंच नावाने नवी आघाडी उघडण्यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः अशी ‘पत्रं’ जी महाविकास आघाडीसाठी ठरली ‘विस्फोटक’!)

प्रशांत किशोर-पवार भेटीवर पडळकरांची टीका

प्रशांत किशोर यांच्या सारख्या स्वयंघोषित भाडोत्री चाणक्याला भेटावे लागत आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा अस्त होतोय, अशी टीका गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.