शरद पवार (Sharad Pawar) यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात असणार आहे. मात्र आता शरद पवारांकडून ही झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरक्षेत वाढ करण्यात आल्याबाबत 15 ऑगस्ट रोजी शरद पवारांना गृह मंत्रालयाकडून पत्र पाठवण्यात आले होते.
शरद पवारांना शंका
शरद पवार (Sharad Pawar) यांना झेड प्लस सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांनी याबद्दल शंका उपस्थित केली होती. शरद पवार म्हणाले की, देशात तीन लोकांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाला आहे. मी विचारले तीनमध्ये इतर दोन कोण आहेत? तर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव सांगितले. मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आहेत. त्यामुळे सगळीकडे फिरावे लागते. त्यामुळे योग्य आणि अचूक माहिती मिळविण्याची व्यवस्था केलेली असावी. नक्की काय हे सांगू शकत नाही. पण गृहविभागाचे संबंधित अधिकाऱ्यांशी मी संवाद साधणार आहे. त्यानंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरविणार आहे.
शरद पवारांच्या (Sharad Pawar) दिल्लीतील निवासस्थानी झेड प्लस सुरक्षेबाबत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सीआरपीएफचे डीजी स्वतः उपस्थित होते. त्यांच्याकडून शरद पवारांना सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी झेड प्लस सुरक्षेमधील काही अटी शरद पवारांनी नाकारल्या आहेत. सुरक्षा दलाची गाडी वापरण्याचा आग्रह पवारांना अमान्य आहे. तसेच, घरात सुरक्षाकडे नसावे, अशी सूचना शरद पवारांनी केल्याचीही माहिती मिळत आहे.