शरद पवार रुग्णालयातून घरी परतले! राज्याचा गाडा रुळावर येणार का? 

६ दिवसांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार रुग्णालयातून घरी परतले. मात्र राजकारणातील तेवढ्या कालावधीतील त्यांच्या गैरहजेरीने महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक ताणतणावाचे प्रसंग घडले. पवार यांना आता हा तणाव शांत करावा लागणार आहे. 

86

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावर ब्रीच कॅंण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्यानंतर २ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. २९ मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मागील ६ दिवस शरद पवारांची अनुपस्थिती राज्याच्या राजकारणात प्रखरतेने जाणवली. या कालावधीत महाविकास आघाडीतील नेते दररोज एकमेकांवर टीका करू लागले, तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढत्या कोरोनावर ठोस निर्णय घेऊ शकले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता पवार पुन्हा सक्रिय होतील आणि मुख्यमंत्र्यांना हायसे वाटेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल केलेले!

शरद पवार यांच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कॅंडी येथे दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्याचे निदान केले. तपासणी झाल्यानंतर शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी २ दिवस त्यांची औषधे बंद करण्यात आली होती. त्यामुळे पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

पवार लॉकडाऊनचा निर्णय घेणार? 

शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे केवळ निर्मातेच नाहीत तर महाविकास आघाडीचे तारणहारही आहेत. म्हणूनच त्यांच्या एक आठवडा राजकरणात सक्रिय नसण्याने राज्याच्या कारभारावर झालेला परिणाम स्पष्ट जाणवला. राज्यात देशाच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना रुग्ण झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लॉकडाऊन लावायचा कि नाही, याच द्विधा मनस्थितीत राहिले आहेत. एका बाजूला लॉकडाऊनला विरोधकांचा विरोध, तर दुसरीकडे कोरोना वाढतोय, अशा कात्रीत मुख्यमंत्री सापडले आहेत. त्यांना विरोधकांना समजावण्यात अपयश येत आहे. त्यामुळे शरद पवार आता सर्व यंत्रणा हातात घेऊन यावर सर्वसमावेश निर्णय घेतील, अशी शक्यता आहे.

(हेही वाचा : लॉकडाऊनला विरोध नाही, पण समाजातील शेवटच्या घटकाचे काय? )

पश्चिम बंगालमध्ये जाणार? 

याआधी शरद पवार हे केरळ आणि पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात जाणार होते असे ठरले होते, मात्र या आजारपणामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द झाले. पश्चिम बंगालच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणूक प्रचारात पवार सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त होते आहे.

ममता बॅनर्जींच्या पत्राचा विचार करणार? 

पवार रुग्णालयात असतानाच तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून देशात भाजपच्या विरोधात मजबूत पर्याय उभा करण्याची सूचना केली. त्या पर्यायावरही शरद पवार आता गांभीर्याने विचार करण्याची शक्यता आहे, कारण ‘देशात जर तिसरी आघाडी उभी करण्यासाठी कुणी प्रस्ताव दिला, तर त्याचा विचार करू’, असे पवार मागील महिन्यात दिल्लीत म्हणाले होते. आता ममता बॅनर्जी यांच्या पत्राचा ते तो ‘प्रस्ताव’ म्हणून विचार करणार का, हे पाहावे लागणार आहे.

संजय राऊत यांना समज देणार का? 

पवार रुग्णालयात होते, त्या ६ दिवसांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दररोज भडक वक्तव्य करून आणि सामानातून टीकात्मक लिखाण करून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्याचे  बेहाल केले. कधी युपीएचे प्रमुख बिगर काँग्रेस आणि गांधी घराण्याशिवाय दुसरा व्हावा, युपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार असावेत, अशी वक्तव्ये करून महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या नेत्यांचा रोष वाढवला आहे, तर दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सामानातून जहरी टीका करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना फटकारले आहे. तर वाझे याला नका घेऊ सांगूनही त्यांना पोलीस दलात घेतले, असे सांगून ‘रोखठोक’ मधून अप्रत्यक्षपणे शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे, त्यामुळे राऊत यांना आवरायचे कसे, असा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. शरद पवार आता राऊत यांना समज देणार का, हेही पहावे लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.