तिसरी आघाडी, ताडी, माडी फिट्ट बॉडी

139

भारतीय जनता पक्षाचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजप विरोधी गट सक्रिय झाला आहे. २०१४ ला भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून या गटात एक प्रकारची अस्वस्थता होती. परंतु या गटाचे दुर्दैव असे की यांच्याकडे कुणी चांगला तरुण नेता नाही. आधीच्या फळीतले जे नेते आहेत, ते आता वयोवृद्ध झाले आहेत. अनेक नेत्यांना तर जनतेने सपशेल नाकारले आहे. त्यापैकी एक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले शरद पवार.

( हेही वाचा : भाजपा सिरीयल किलर, मग आप सिरीयल डीलर?)

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजप सोबत युती तोडून आरजेडी-काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आहे. नितीश कुमारांचं एक बरं आहे, ते सर्व पक्षांसोबत युती करतात आणि स्वतःच मुख्यमंत्री असतात. त्यांना कोणताही पक्ष चालतो. सर्वपक्ष समभाव अशीच भावना बिचार्‍या नितीश कुमारांची असावी. असो.

तर मुद्दा असा आहे की तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव बिहारच्या दौर्‍यावर जाणार आहेत. ते मुख्यमंत्री नितिश कुमार यांची भेट घेणार आहेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगत आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.

केसीआर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “२०२४ मध्ये भाजपमुक्त भारत करण्याचा संकल्प केला पाहिजे.” असंही म्हटलं जातं की केसीआर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक बिगर भाजप मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत.

“खानेवालो को खाने का बहाना चाहिए” ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल. तसेच पीने वालो को भी पीने का बहाना चाहिए. कारण मद्यपान करणारा माणुस बर्‍याचदा मद्यपानात औषधी गुण शोधतो. मग बियर प्यायल्याने किडणी स्टोन बरा होतो, अशी एक अफवा मध्यंतरी पसरली होती. गावाकडे ताडी माडी केंद्राचा खूपच उदो उदो होत असतो. गावाकडे तळीरामांची एक म्हण आहे ताडी माडी, फिट्ट बॉडी. म्हणजे ताडी किंवा माडी प्यायल्याने आरोग्य चांगलं राहतं. पिणार्‍याला पिण्यासाठी बहाणा हवाच असतो.

आता केसीआर तिसरी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. असा प्रयत्न २०१९ला देखील झाला होता. पण सगळे पंतप्रधानपदाचे दावेदार असल्यामुळे तो प्रयोग फसला. आता शरद पवारांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे एक भावी पंतप्रधान कमी झाला आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी असे अनेक भावी पंतप्रधान सध्या रांगेत आहेत.

२०१४ पासून मोदी विरोधकांना हरण्याची सवय लागलेली आहे. कारण लोक त्यांना का नाकारत आहेत, हेच त्यांना अजून समजलेलं नाही. ते स्वतःला भारताचे तारणहार समजत आहेत. पण या सगळ्यांचे मुद्दे पाहिले, आंदोलने पाहिली तर आपल्या असं लक्षात येतं की लोकांनी आपली मते देऊ नये यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. हारने वालो को हारने का बहाना चाहिए अशी या सर्वांची गत झालेली आहे. बरं, ताडी माडी फिट्ट बॉडी या तळीरामांच्या म्हणीचा आणि तिसर्‍या आघाडीचा संबंध कृपया मला विचारु नका. हा केवळ एक योगायोग समजावा…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.