राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फाळणीचा रक्तरंजित इतिहास शालेय अभ्यासक्रमातून वगळण्याची सूचना केली आहे. फाळणीच्या रक्तरंजित इतिहास वाचनाचा विद्यार्थ्यांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे तो इतिहास शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून वगळावा. महाराष्ट्राच्या सरकारने ही सूचना केंद्र सरकारला करावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली. सरहद संस्थेच्या या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
यापूर्वीही संभाजीनगर येथील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या फाळणी स्मरणदिनाच्या उपक्रमाला विराेध केला होता. केंद्रातील मोदी सरकारकडून वारंवार समाजात तेढ आणि द्वेष पसरवण्याचे काम सुरु आहे. यामुळे देशभरात उन्मादाचे प्रमाणही वाढले आहे. सीबीएसईने शाळांमध्ये ‘फाळणी स्मरणदिन’ साजरा करण्यासाठी नुकतेच पत्रक काढले. याला आक्रमकपणे विरोध करण्याचे आवाहन त्या वेळी शरद पवार यांनी केले होते.
(हेही वाचा – Onion : कांद्याच्या राखीव साठ्यात 5 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढ)
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकालात केंद्र सरकारने 14 ऑगस्ट हा विभाजन विभीषिका दिवस म्हणून पाळला. विभाजन विभीषिका दिवसाच्या निमित्ताने देशाच्या फाळणीसाठी कोण जबाबदार होते ? त्यावेळी कोणी निर्णय घेतले ? याचा उलगडा होत असताना फाळणीचा रक्तरंजित इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो आहे. सीबीएससी बोर्डाने फाळणीच्या इतिहासाला शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले आहे; पण आता हेच शरद पवार यांना अडचणीचे वाटत आहे. १४ ऑगस्टच्या रात्री फाळणीच्या वेळी देशवासीयांनी अनेक आघात सहन केले. या वेळी लाखो महिलांवर अत्याचार करण्यात आले. पाकिस्तानमधून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमधून अत्याचार केलेल्या महिलांचे अवयव, मृतदेहांचा खच भारतात येत होता. या सर्व आघातांविषयी आता ७५ वर्षांनंतर तरी जागृती होत असताना शरद पवार यांनी केलेले हे विधान हे इतिहास नाकारण्यासारखे आहे, अशा प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांतून व्यक्त होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community