राज्यात अजूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवास्थानावरील दोन कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. मात्र यापैकी कुणाही पवारांच्या संपर्कात नव्हता. दरम्यान शरद पवार यांच्या निवासस्थानी 15 सुरक्षारक्षक तैनात असतात. एकूण सहा जणांची रॅपिड अँटिजन कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी तीन सुरक्षारक्षक आणि दोन कर्मचारी अशा पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
“शरद पवार व्यवस्थित आहेत. कालच त्यांची टेस्ट करण्यात आली होती, त्यांना कोणतीही अडचण नसून ते सुरक्षित आहेत” अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सिल्व्हर ओकमधील इतर सर्व कर्मचारी आणि शरद पवार यांचे पीए यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचे रिपोर्ट येणं बाकी आहे. त्यामुळे शरद पवार पुढील चार दिवस कुणालाही भेटणार नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे या दोघांच्याही सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील दोन पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. सुदैवाने या सर्व सुरक्षाकर्मींनी कोरोनावर मात केली आहे.
Join Our WhatsApp Community