शरद पवारांनी मविआतून बाहेर पडून पंतप्रधान मोदींसोबत काम करावं – रामदास आठवले

207

नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करावं, अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना शुक्रवारी आठवले यांनी बीडमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील मुख्य कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना रामदास आठवलेंनी हे वक्तव्य केलं.

शरद पवार हे अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यांनी नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत काम करावं अशी माझी इच्छा आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये कितीही नेते उभे राहिले तरी त्यांचा पराभव करणं कोणालाही शक्य होणार नाही. त्यामुळे शरद पवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत काम करावं, असं आठवले म्हणाले.

पुढे आठवले म्हणाले की, नागालँडमधील निवडणुकीत आम्ही आठ जागा लढवल्या त्यापैकी आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या. जसा करिष्मा नागालँडमध्ये झाला आहे तसाच करिष्मा येत्या काळात महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत करून दाखवू. पण या निवडणुका भाजप आणि शिंदे यांच्यासोबत राहून लढू आणि आपल्या पक्षाचं खातं उघडू, असं रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचा – हसन मुश्रीफांच्या पुणे, कोल्हापुरातील मालमत्तांवर ईडीची पुन्हा छापेमारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.