सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकार बॅकफूटवर गेले असताना ठाकरे सरकारने गुरुवारी होणारी मंत्रिमंडळ बैठक देखील रद्द केली. एकीकडे राज्यातली कॅबिनेट जरी रद्द झाली असली तरी देखील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्यातील नेत्यांच्या बैठका मात्र वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत होणाऱ्या सुपर कॅबिनेटमध्ये नेमकं शिजतंय तरी काय, असा प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख दिल्लीत
मागील दोन दिवस दिल्लीत शरद पवार यांच्या राज्यातील परिस्थितीवर बैठका सुरू असताना, आज अनिल देशमुख यांनी देखील सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी सचिन वाझे प्रकरणावरुन राज्यात सुरू असलेल्या घडामोडींचा गृहमंत्र्यांकडून आढावा घेतल्याचे समजते. तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरुन हटवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर मोठमोठे खुलासे होत आहेत. त्यामुळे गृहखाते बदनाम होत असल्याची भावना आहे. त्यामुळेच अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपदावरुन हटवण्याची शक्यता आहे.
(हेही वाचाः संजय निरुपम यांचे शिवसेनेवर शरसंधान… म्हणाले ही सत्ता प्रायोजित हप्ता वसुली!)
पवारांच्या भेटीनंतर देशमुख काय म्हणाले?
आज सकाळी मी दिल्लीत आलो होतो. विदर्भात, नागपुरात मिहान प्रकल्प सुरु आहे. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या इंडस्ट्री येण्याचा विचार आहे. त्यामुळे आमच्या विदर्भात या इंडस्ट्री आल्या पाहिजेत, यासाठी पवार साहेबांची मदत घेण्यासाठी मी आलो होतो. पवार साहेबांना मिहान प्रकल्पाचे डिटेल्स दिले. त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा करत असताना, पवार साहेबांनी साहजिकच मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाची माहिती घेतली. एनआयए आणि एटीएस या प्रकरणाचा सर्व तपास करत आहेत. त्यांना राज्य शासनाकडून सर्व मदत आहे. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. याचा संपूर्ण रिपोर्ट येत नाही, त्याची संपूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर बोलणे योग्य नाही. रिपोर्ट आल्यानंतर त्यानुसार पुढील कारवाई राज्य सरकार करेल, अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली.
संजय राऊत-पवारांमध्ये नेमकं काय शिजतंय
सगळ्यात महत्वाचे म्हणजे राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येताना ज्यांनी एकहाती पत्रकार परिषदा घेत खिंड लढवली होती, ते शिवसेना खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांच्या देखील दिल्लीतील भेटी वाढत चालल्या आहेत. नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतल्या घरी शरद पवार, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, खासदार संभाजी राजे यांची भेट झाली. यावेळी त्या ठिकाणी पत्रकार राजदीप सरदेसाई देखील उपस्थित होते. त्यामुळे राऊत-पवार आता कोणता नवा अंक लिहीत तर नाहीत ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(हेही वाचाः पवारांच्या नातवाने घेतली विरोधीपक्ष नेत्यांची भेट! कारण मात्र गुलदस्त्यात…)
या मुद्यावर दिल्लीत खलबते
दिल्लीमध्ये शरद पवार जी सुपर कॅबिनेट घेत आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने मुद्दा आहे तो म्हणजे सचिन वाझे प्रकरणाचा. या प्रकरणामुळे सध्या महाविकास आघाडीची पुरती बदनामी झाली असून, त्यावर दिल्लीत बसून चर्चा सुरू आहे. भविष्यात हे प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी आता शरद पवार खुद्द मैदानात उतरले असून, ते सर्व तपशील जाणून घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील दिल्लीत बोलावले होते. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली जिलेटीन. तसेच गृहमंत्री बदलायचे की नाही, यावर देखील सध्या दिल्लीत जोरदार चर्चा सुरू असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community