यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर शरद पवारांचे शक्तिप्रदर्शन

238
यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर शरद पवारांचे शक्तिप्रदर्शन

अजित पवार यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेना-भाजपा युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर शक्तिप्रदर्शन केले. लोकशाहीच्या मार्गाला, शांततेवर विश्वास असणाऱ्या शक्तींना धक्का देणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना पूर्णपणे बाजूला करण्यासाठी साथ द्या, असे अवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

शरद पवार म्हणाले, आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हे बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैरभावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत.

(हेही वाचा – सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटन क्षेत्र घोषित करणार – मंगलप्रभात लोढा)

महाविकास आघाडी सरकारमार्फत राज्याची सेवा होत असताना ते सरकार या ना त्या पद्धतीने उलथून टाकण्याचे काम काही लोकांनी केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले. चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व जातीय आणि तत्सम विचारधारा आहेत, यातून देशाचा कारभार पुढे नेण्याचा प्रयत्न होतोय असेही शरद पवार म्हणाले.

महाराष्ट्रात जनमानस तयार करणार

आज (३ जुलै) गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाणसाहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद, असेही पवार म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.