देशात भाजपचा विजय रथ प्रादेशिक पक्ष रोखू शकतात, हे पश्चिम बंगालने दाखवून दिले आहे, अशी वक्तव्य अनेकदा एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर त्याही पुढे जात दसरा मेळाव्यात बोलताना येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये पश्चिम बंगला पॅटर्न राबवण्याची तयारी ठेवा, असे जाहीरच केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील सेने आणि एनसीपी या दोन महत्वाच्या पक्षाचे बंगाल पॅटर्नवर एकमत होताच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यावर पुढील चर्चा करण्यासाठी सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
पवारांचा महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा विचार!
उद्धव ठाकरे यांनी मी शिवसेनाप्रमुखाना शब्द दिल्यामुळे मुख्यमंत्री पद स्वीकारल्याचे म्हटल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत ‘उद्धव यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती, ती त्यांनी पूर्ण केली’, असे म्हटले. त्यानंतर मात्र एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्याचा खुलासा करत ‘माझ्या आग्रहाखातर ठाकरे मुख्यमंत्री बनले’, असे म्हणाले. अशा रीतीने ठाकरेंवरील आरोपाचे पवारांनी खंडन केल्यावर सोमवारी पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात ज्या प्रकारे भाजपावर टीकेचे अस्त्र उगारले, हे पाहता येणाऱ्या निवडणुकांमध्ये सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आणखी बिकट बनली आहे. म्हणूनच शरद पवारांनी आता याला पुढची दिशा देण्याची योजना आखून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी बनवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवता येईल का? पश्चिम बंगालमध्ये जसा भाजपचा विजयरथ रोखण्यात आला, तसा तो निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रातही रोखता येईल का?, अशी शक्यता पडताळण्यासाठी पवार मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. मात्र वास्तविक पश्चिम बंगालमध्ये भाजपाची काहीही शक्ती नव्हती, तिथे भाजपा क्रमांक २ चा पक्ष बनणे, हा भाजपचा पराजय म्हणता येणार नाही, असा खुलासा याआधीही भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा पश्चिम बंगालशी संबंध लावता येणार नाही, असे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community