केंद्राने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले! शरद पवारांची टीका 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कंबरडे मोडले आहे, त्याचा फटका सगळ्यांच बसलेला आहे. शेतकऱ्यांसाठी तर सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

आधीच केंद्र सरकारने इंधन वाढ केलेली आहे, त्यात आता केंद्राने खतांच्या किंमती वाढवल्याने नवे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. सध्याच्या संकटांच्या काळात खतांच्या किंमती वाढवणे हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. ही दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यासंबंधी पवार यांनी केंद्रीय रसायने व खते मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांसाठी काळ वाईट! 

शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री गौडा यांना मंगळवारी, १८ मे रोजी पत्र लिहिले. त्यात खतांच्या दरवाढीवर तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. पवार यांनी केंद्राचा खत दरवाढीचा निर्णय धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार व्हावा व दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कंबरडे मोडले आहे, त्याचा फटका सगळ्यांच बसलेला आहे. शेतकऱ्यांसाठी तर सध्याचा काळ अत्यंत वाईट आहे. अशावेळी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज असताना सरकार मात्र खतांच्या किंमती वाढवून त्यांच्या अडचणीत भर टाकत आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा : लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले आदित्य ठाकरे? )

खतांच्या किमती पूर्ववत करा! 

कोरोनामुळे देशातील अनेक भागांत सातत्याने लॉकडाऊन लावावे लागत आहे. त्यातून बाजार व्यवस्था कोलमडल्याने त्याचा मोठा फटका शेतमालाला आणि परिणामी शतेकऱ्याला बसला आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. अशावेळी खतांच्या वाढीव किंमतीमुळे शेतीवरील खर्चात आणखी वाढ होणार आहे. आधीच इंधनाचे दर वाढल्याने आर्थिक भार पडला असताना आता खत दरवाढ करून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केंद्र सरकारने केले आहे, असे पवार यांनी पुढे नमूद केले आहे. या प्रश्नी आपण व्यक्तीशः लक्ष घालून खतांच्या वाढीव किंमती पूर्ववत केल्यास मला आनंद होईल, अशी विनंती शरद पवार यांनी सदानंद गौडा यांना केली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत होईल, असे निर्णय अपेक्षित असल्याचेही पवार यांनी पुढे नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here