शरद पवारांचा गड Satara जिल्ह्याला जाणार तडा; निवडणुकीत MVA समोर कडवे आव्हान

वाई व फलटण मतदारसंघांत दोन्ही राष्ट्रवादीतच प्रमुख लढत असून, माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, कोरेगावात काट्याची टक्कर होणार आहे.

164
  • नित्यानंद भिसे 

सातारा (Satara) जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघात १०९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघांतील ५ मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने उमेदवार उभे केले आहेत, एका ठिकाणी उबाठाने एका ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर दोन ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. तर महायुतीत भाजपाने ४ ठिकाणी, शिवसेना उबाठाने २ ठिकाणी, तर २ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार उभे आहेत. पाटणमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज ठेवल्याने तेथे तिरंगी लढत होत आहे. वाई व फलटण मतदारसंघांत दोन्ही राष्ट्रवादीतच प्रमुख लढत असून, माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण, कोरेगावात काट्याची टक्कर होणार आहे.

सातारामध्ये उदयनराजेंच्या पाठिंब्यामुळे शिवेंद्रराजेंचे पारडे जड

विधानसभा निवडणुकीत सातारा-जावली (Satara) मतदारसंघातील चित्र आता स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातून ११ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आता या ठिकाणी ८ उमेदवार रिंगणात आहेत. तरीही या ठिकाणी भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आणि उबाठाचे अमित कदम यांच्या खरी लढत होणार आहे. मात्र या ठिकाणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना पाठिंबा दिल्यामुळे इथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे पारडे जड असल्याचे चित्र आहे.

कोण उमेदवार आहेत रिंगणात?

सातारा (Satara) विधानसभेच्या आखाड्यात आता 8 उमेदवार आहेत. त्यामध्ये महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले, मविआचे अमित कदम, बसपाचे मिलींद कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बबन करडे, रासपचे शिवाजी माने तसेच अपक्षांमध्ये डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले, गणेश जगताप, कृष्णा पाटील यांचा समावेश आहे. राजेंद्र कांबळे, प्रशांत तरडे, अविनाश कुलकर्णी, वसंतराव मानकुमरे, हणमंत तुपे, सागर भिसे, दादासाहेब ओव्हाळ, विवेकानंद बाबर, सखाराम पार्टे, सोमनाथ धोत्रे यांनी  मागे घेतले.

महायुतीची हवा 

मागील विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ही लढत लक्षवेधक होणार असल्याचे दिसत आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपा-महायुतीत आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. त्यांना खासदार उदयनराजे भोसले यांची साथ मिळाल्यामुळे ताकद मतवाढली असून (Satara)  मतदारसंघातील वातावरण पालटले आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आखलेले सर्वच राजकीय डावपेच यशस्वी ठरल्यामुळे मतदारसंघात भाजप-महायुतीची हवा निर्माण झाली आहे. त्यांनी मतदारसंघात जोरदार रान उठवले असून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच प्रचाराचे रान तापवले आहे.

(हेही वाचा Wai मध्ये तिरंगी लढत; महायुतीतील बंडखोरीचा मकरंद पाटलांना बसणार फटका?)

पाटणमध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?

पाटण (Patan) विधानसभा निवडणुकीत आता चित्र स्पष्ट झाले आहे. इथे मविआमध्ये बंडखोरी झाल्यामुळे महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी जमेची बाजू बनली आहे. या ठिकाणी महायुतीचे शंभूराज देसाई हे अधिकृत उमेदवार आहेत, तर उबाठाचे हर्षद कदम हे मविआचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी केल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र, हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उबाठामध्येच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत. पाटणचा (Patan)  विद्यमान आमदार पक्ष सोडून गेला तरी कदम यांनी उबाठातून उमेदवारी मागितली. त्यांनीही गेल्या अडीच वर्षांपासून पाटण येथील मूळचे पनवेल, ऐरोलीपासून ते मुलुंड, कुर्ला, दादरपर्यंत स्थायिक असलेल्या मुंबईल्या भागवाल्यांशी संपर्क ठेवला आहे. (Satara)

पाटणची भिस्त मुंबईतील माथाडींवर 

पाटण (Patan) मतदारसंघात गेल्या ५ वर्षांत जवळपास २ हजार ९२० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. पाटण मतदारसंघातील रणसंग्राम आतापर्यंत शंभूराज देसाई आणि सत्यजित पाटणकर यांच्यात होत आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पक्ष कोणताही असो, देसाई आणि पाटणकर या दोघांत पारंपरिक लढत होत आली आहे. दोन्ही गटांनी चुरशीने झुंज दिली आहे. याठिकाणी प्रत्येक गावातील एकेक मतदानासाठी दोन्ही गट प्रयत्नशील असतात. पाटणचा (Patan) मतदार माथाडी कामगार तसेच इतर अनेक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असून, सुमारे ४० हजारांहून अधिक मतदार येथे आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोन्ही गटांनी कसोसीने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील उबाठानेही पाटणवर लक्ष केंद्रित केले आहे. देसाई आणि पाटणकर यांचे गट मुंबईतल्या या मतदारांशी संवाद साधत असताना पाटणमधील उबाठानेही अडीच वर्षांपासून मुंबईत राबता ठेवला आहे. यामुळे पाटणच्या लढ्यात तिरंगी लढत होणार असली तरी बंडखोरीमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता आहे. (Satara)

(हेही वाचा विकासद्रोही, राज्यद्रोही, धर्मद्रोही, जनताद्रोही मविआच्या नेत्यांना धडा शिकवा; Pravin Darekar यांचे आवाहन)

वाईमध्ये महायुतीतील बंडखोरीचा मकरंद पाटलांना बसणार फटका?

सातारा जिल्ह्यात (Satara) पाटण विधानसभा मतदारसंघात मविआतील बंडखोरीमुळे तिथे महायुतीचे शंभूराज देसाई यांना फायदा होण्याची शक्यता आहे, ततसा वाई (Wai)  विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने त्याचा फटका महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार मकरंद पाटील यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत, मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणते उमेदवार आहेत रिंगणात? 

वाई (Wai) मतदारसंघ यापूर्वी काँग्रेस आणि गेल्या तीन टर्मपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मविआच्या जागा वाटपात वाई विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आला आहे. तर, महायुतीमधील सिटींग गेटिंग सूत्रानुसार ही जागा अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. या मतदारसंघात आमदार मकरंद पाटील यांच्यापुढे सातारा (Satara) जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ या मविआच्या अधिकृती उमेदवाराचे आव्हान असणार आहे. विरोधकांचा उमेदवार कोण असणार हे जाहीर होत नसल्याने मकरंद पाटील यांच्यासाठी सोपी वाटणारी निवडणूक आता आव्हानात्मक बनली आहे. 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले अशी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, यावेळी मदन भोसले भाजपामध्ये आहेत.

बंडखोर उमेदवार अडचणीत आणणार? 

वाई (Wai) मतदारसंघातून शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम जाधव यांनी लढण्याची तयारी केली होती. पण, जागावाटपात मतदारसंघ पक्षाकडे येणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही चाचपणी केल्याची माहिती समोर आलेली. त्यानंतर त्यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि अपक्ष अर्ज भरला. जाधव यांनी यापूर्वी सातारा लोकसभा तसेच वाई (Wai) विधानसभेचीही निवडणूक लढवली. अनेक वर्षांपासून ते राजकारणात सक्रीय आहेत. यामुळे त्यांची उमेदवारी युती की आघाडीच्या उमेदवाराला मारक ठरणार, का तेच बाजी मारणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

कोरेगाव मतदारसंघात शशिकांत शिंदेंना महेश शिंदेंचे तगडे आव्हान

कोरेगाव (Koregaon) विधानसभा मतदारसंघात 27 पैकी 10 जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात 17 जण राहिले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे विरूध्द शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे यांच्यातच टफ फाईट होणार आहे. मागील विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभेत निसटता पराभव स्वीकारणारे शशिकांत शिंदे दोन्ही निवडणुकांचा वचपा काढणार की महेश शिंदे पुन्हा एकदा विकासकामांच्या जोरावर बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

कोरेगाव (Koregaon) विधानसभा मतदारसंघात 32 उमेदवारांनी 44 अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेमध्ये 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. आज अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 27 पैकी 10 जणांनी माघार घेतल्याने 17 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. यामध्ये 12 अपक्ष आहेत. लोकसभेला तुतारीसारखे पिपाणी हे चिन्ह आणून डाव टाकण्यात आला होता. तोच डाव पलटवण्यासाठी कोरेगाव मतदारसंघात नावसाधर्म्य असणारे उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून आ. महेश संभाजीराजे शिंदे, शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे, रासपचे उमेश चव्हाण, वंचितचे चंद्रकांत कांबळे, रिपब्लिकन सेनेचे संतोष भिसे निवडणूक रिंगणात आहे. तर अनिकेत खताळ, उध्दव कर्णे, तुषार मोतलिंग, दादासाहेब ओव्हाळ, महेश किसन शिंदे, महेश कांबळे, महेश सखाराम शिंदे, महेश संभाजीराव शिंदे, सदाशिव रसाळ, सचिन महाजन, सोमनाथ आवळे, संदीप साबळे हे अपक्ष उमेदवार आखाड्यात आहेत.

महेश शिंदेंच्या विकासकामांचा परिणाम 

2019 च्या निवडणुकीत नवख्या असणाऱ्या महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा निसटत्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवाची चर्चा रंगली होती. पराभवानंतर शशिकांत शिंदे यांनी जनसंपर्कावर भर देत संघटन मजबूत केले. दरम्यानच्या कालावधीत शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात फूट पडली. शिवसेनेचे महेश शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात जावून सत्तेत प्रवेश केला. तर आ. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी निष्ठा दाखवत पवारांच्या सोबत राहिले. गत पाच वर्षाच्या कालावधीत या दोन्ही आमदारांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. अनेकदा टोकाचे वादही झाले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला जिल्ह्यात उदयनराजेंविरोधात चेहरा न मिळाल्याने शशिकांत शिंदे यांनी हे शिवधनुष्य उचलत लोकसभेला उमेदवारी केली. या निवडणुकीत त्यांनी उदयनराजेंना कडवी टक्कर दिली. या निवडणुकीत कोरेगाव (Koregaon) मतदारसंघात सुमारे 7 मतांनी ते पिछाडीवर राहिले. तर महेश शिंदे यांनी तळागाळात केलेली विकासकामे, जनसंपर्क व कार्यकर्त्यांचे जाळे या जोरावर उदयनराजेंना आघाडी मिळवून दिली. आताच्या निवडणुकीतही महेश शिंदे विरूध्द शशिकांत शिंदे यांच्यातच लढत होणार आहे. यामध्ये शशिकांत शिंदे यांच्याकडून मतदारसंघात सुरू असलेल्या दडपशाही व हुकूमशाहीविरोधात भूमिका घेवून निवडणूक लढवली जाणार आहे. तर महेश शिंदे यांच्याकडून गावागावात केलेली विकासकामे व पाणी प्रश्नावर निवडणूक लढवली जाणार आहे.

(हेही वाचा Patan मध्ये मविआतील बंडखोरी शंभुराज देसाईंच्या पथ्यावर?)

कराड दक्षिणमध्ये दुरंगी लढत; पृथ्वीराज चव्हाण पुन्हा बाजी मारणार?

कऱ्हाड (Karad South) दक्षिण विधानसभा मतदार संघातून १२ जणांनी अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

आपक्षांमुळे अडचणी वाढतील 

दरम्यान कऱ्हाड (Karad South) दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. कऱ्हाड दक्षिणमधून भाजपाकडून अतुल भोसले, काँग्रेसकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण, बहुजन समाज पार्टीकडून विद्याधर गायकवाड, स्वाभिमानी पक्षाकडून इंद्रजित गुजर, राष्ट्रीय समाज पक्षाकडून महेश जिरंगे, वंचित बहुजन आघाडीकडून संजय गाडे, अपक्ष म्हणून विश्वजीत पाटील उंडाळकर व शमा शेख हे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. या मतदारसंघात अनेक उमेदवार हे पक्ष आणि संघटनेशी संबंधित होते. त्यांच्या उमेदवारीमुळे पक्षांच्या प्रमुख लढतीतील उमेदवारांना फटका बसणार होता. त्याचा विचार करुन पक्षाचे पदाधिकारी, नेते यांनी संबंधितांचे अर्ज मागे घेण्यासाठी त्यांची मनधरणी केली. बराचवेळ चर्चा झाल्यानंतर संबंधितांना उमेदवारी अर्ज मागे घेतले. (Satara)

कराड उत्तरमध्ये भाजपाचे मविआला मोठे आव्हान

कराड उत्तर (Karad North) विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवादी शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपाचे मनोज घोरपडे असा सामना पाहायला मिळत आहे. यशवंत विचाराचा मतदारसंघ असलेल्या कराड उत्तर मतदार संघात संस्थात्मक राजकारण आणि शरद पवारांची साथ यामुळे बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत ५ वेळा कराड उत्तरचे आमदार राहिले. मात्र, यंदाची निवडणूक बाळासाहेब पाटील यांच्यासाठी नक्कीच सोप्पी नाही. या ठिकाणी ‘मनो”धैर्य’ एकवटल्याने बाळासाहेबांना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागत आहे. मतदारांची नाराजी असणे आणि मतदारसंघात भाजपाचे तयार झालेले वातावरण यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार असे दिसत आहे. या गोष्टीमुळे बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी यंदा मोठा संघर्ष करावा लागेल हे मात्र नक्की.

फलटणमध्ये महायुतीचा विजय सोपा  

फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला. या ठिकाणी अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली. त्यामुळे या ठिकाणी दीपक चव्हाण यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फलटण म्हंटल कि रामराजे हे जणू समीकरणच आहे. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी रामराजेच फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळं सांगायला नको. शरद पवार गटाकडून आमदार दीपक चव्हाण तर युतीच्या माध्यमातून सचिन कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामराजेंच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संस्थात्मक राजकारण आणि निंबाळकर घराण्याचे वलय यामुळे दीपक चव्हाण हेच पुन्हा फलटणचे आमदार होतील यात शंका नाही.

माणमधून भाजपा विजयाचा चौकार मारणार 

माण खटाव मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चाैथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गोरेंनी नुकतीच कार्यकर्त्याची बैठक घेत शरद पवार यांच्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता नाराजी नंतर शेखर गोरे कोणाच्या पारड्यात मते टाकणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तरीही जयकुमार गोरे यंदाही आपली आमदारकी टिकवतील असे दिसत आहे. (Satara)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.