‘वय झाले, आता तरी थांबा’, अशी आर्जवी विनंती अजित पवार यांनी ५ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांना केली होती. त्याचा समाचार पवार यांनी नाशिकमधील सभेत घेतला. पवार म्हणाले, वय झालं, आता निवृत्त व्हा, असे ते सांगत आहेत. माझं वय ८२ वर्षे आहे, हे खरं आहे. पण गडी काय, हे त्यांनी कधी पाहिलं कुठं? माझ्या वयावर याल, तर महागात पडेल, असा इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला.
अजित पवारांसह राष्ट्रवादीतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार यांनी शनिवारी (८ जुलै) नाशिकच्या येवल्यात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी अजित पवारांसोबत पक्षाशी बंडखोरी करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यावर तिखट हल्ला चढवला. तसेच आगामी निवडणुकीत त्यांना पराभूत करण्याचे मतदारांना आवाहन केले. भुजबळांना सेफ जागा द्यायची होती, त्यामुळे मीच येवला मतदार संघाचे नाव सूचवले. येथील मतदारांनी मी सूचवलेल्या अनेक नेत्यांना निवडून दिले. पण छगन भुजबळांविषयी माझा अंदाज चुकला. त्यामुळे मी तुमची माफी मागण्यासाठी आलो आहे, असेही पवार म्हणाले.
(हेही वाचा – Congress : आमच्या पुरेशा जागा नाही, आम्ही लढणार नाही – काँग्रेसची माघार)
शकुनीमामा कोण, कमळाचे फुल की टरबूज – कोल्हे
– आज कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती आहे. ही लढाई नात्यांची नाही, निती आणि अनितीची आहे. ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. हाच तो शकुनी मामा आहे, ज्याच्यामूळे महाभारत घडले. राजकारणातला शकुनीमामा कोण, कमळाचे फुल की टरबूज, असा टोमणा खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला.
– वारंवार पक्ष फोडले जात आहेत. वारंवार आमदार पळवले जात आहेत. मोदी @9 कार्यक्रम सुरु झाले. मात्र, रोजगार मिळाला का? शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला का? २०१४ मध्ये सांगितले १५ लाख मिळणार. पण, नंतर कळले हा चुनावी जुमला होता.
– विकासासाठी गेलो म्हणतात, मग या विकासाने महागाई कमी होणार आहे का? काद्यांला भाव मिळणार आहे का? या प्रश्नाची उत्तर मिळणार का? राज्यात नवीन देवस्थान निर्माण झाले आहे. त्या देवस्थानचे नाव ‘ईडी’ आहे म्हणतात. हा महाराष्ट्र खंडोजी खोपडेंचा नाही, तर कानोजी राजे देशमुख यांचा आहे, अशी टीका कोल्हे यांनी केली.
सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करू – सुप्रिया सुळे
महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकला नाही. पण, आज मात्र इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून राज्याला दिल्लीपुढे झुकवण्याचे षड्यंत्र दिल्लीतून सुरू आहे. ही लढाई त्यांनी सुरू केली असली, तरी त्याचा शेवट आपण करणार आहोत. महाराष्ट्राविरोधात कुणी कट कारस्थान करत असेल तर त्याला सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community