Sheikh Hasina यांची बांगलादेशातील अखेरची 45 मिनिटे होती कठीण परीक्षा

294

बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आरक्षणावरून अराजक माजले. तेथील वातावरण इतकी तापले की, परिस्थिती सैन्यदल आणि पोलीस दलाच्याही हाताबाहेर गेली. त्यामुळे अखेर शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन दंश सोडून जावे लागले. सध्या त्या भारतात आश्रय घेत आहेत. अवघ्या ४५ मिनिटांत शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले, या ४५ मिनिटांत नक्की काय घडले यावर कहाणी समोर आली आहे.

सोमवारी संतप्त जमावाने ढाका येथे कूच करायला सुरुवात केली. त्यावेळी सुरक्षा व्यवस्थेने सुरक्षेचा आढावा घेतला असता, शेख हसीना यांच्याकडे तिथून सुरक्षित बाहेर निघण्यासाठी केवळ ४५ मिनिटे शिल्लक होती. त्यावेळी शेख हसीना यांच्याकडे २ पर्याय होते. एकतर आपल्याच देशातील लोकांविरोधात ताकदीचा प्रयोग करत त्यांना रोखणे आणि दुसरे पंतप्रधान निवासस्थान सोडत सुरक्षित ठिकाणी जाणे. त्यानंतर हसीना यांनी १५ वर्षाचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ संपवून देश सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयापूर्वी अनेक फोन कॉल आणि बैठकांचा सिलसिला सुरू होता.

(हेही वाचा बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CM Eknath Shinde यांच्याकडून उपाययोजना)

बहीण आणि मुलाने समजावल्यावर निघाल्या शेख हसीना 

बांगलादेशी वृत्तपत्र प्रोथोम अलोच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशात आपल्या अखेरच्या कालावधीत हसीना यांनी पदावर कायम राहण्याचा भरपूर प्रयत्न केला. देश सोडण्यापूर्वी त्यांनी अनेक बड्या अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दलावर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. हसीना सोमवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून जवळपास १ तास कायदा सुव्यवस्थेचा आपल्या गरजेनुसार वापर करत होत्या. तोपर्यंत आंदोलनकर्ते पंतप्रधानांच्या गणभवन निवासस्थानाच्या दिशेने जमा होत होते. बांगलादेशाच्या इतिहासात अशा प्रकारचा जनसागर कुणीही पाहिला नव्हता. रविवारी आंदोलनात झालेल्या मृत्यूमुळे जमावाने गणभवनात घुसण्याचा इशारा दिला. त्यामुळे पुढे काय होणार याची कल्पना हसीना यांना आली होती. सोमवारी कर्फ्यू आणखी कडक करा असा आदेश त्यांनी सुरक्षा दलांना दिला. हसीना यांनी इंटरनेट सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांविरोधात कारवाई करणे बंद केले. त्यानंतर सकाळी १०.३० वाजेपर्यंत वायू सेना, नौदल आणि लष्कराला पंतप्रधान निवासस्थानी बोलावलं. पोलीस महासंचालकांनीही पाचारण केले. परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. जेव्हा अधिकारी शेख हसीना यांना देश सोडण्याचा सल्ला देत होते, मात्र हसीना काहीही ऐकत नव्हत्या. त्यावेळी पंतप्रधानांची बहीण शेख रेहाना यांनी हसीना यांना वेगळ्या खोलीत घेऊन संवाद साधला. त्याचवेळी हसीना यांचा मुलगा सजीब वाजिद जॉय याला एका अधिकाऱ्याने संपर्क साधला. मुलगा परदेशात राहतो. बहीण आणि मुलाने हट्ट केल्यानंतर हसीना राजीनामा देऊन देश सोडण्यास तयार झाल्या. बांगलादेश सोडण्यापूर्वी हसीना यांना देशाला संबोधित करायचे होते. मात्र अधिकाऱ्यांनी त्यांना देश सोडण्यासाठी तुमच्याकडे केवळ ४५ मिनिटे शिल्लक आहेत त्यामुळे तुम्ही संदेश रेकॉर्ड करू शकत नाही असे सांगितले. तेजगाव एअरबेसवरून हेलिकॉप्टरमधून हसीना राष्ट्रपती भवनात पोहचल्या, तिथे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर हसीना त्याच विमानाने भारतात आल्या. अगरतला इथल्या बीएसएफच्या हेलिपॅडवर त्यांनी लँडिंग केले. तिथून संध्याकाळी ५.३६ मिनिटांनी गाजियाबादमधील भारतीय वायू सेनेचे हिंडन एअरबेसवर त्या पोहचल्या. त्याठिकाणी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक बडे अधिकारी उपस्थित होते. सध्या हसीना दिल्लीत आहेत. बांगलादेशात सैन्यानं सत्ता हाती घेतली आहे. लवकरच तिथे अंतरिम सरकार बनवले जाण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.