Raigad जिल्ह्यात ७ पैकी ३ ठिकाणी मविआला शेकापचे आव्हान; महायुतीमध्ये आलबेल

शेकाप आणि उबाठा यांच्यात समेट झाली असला तरी अलिबाग वगळता पेण, पनवेलमध्ये उबाठाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. तर, शेकापने उरणमधून अर्ज मागे  घेतलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे.

190
– नित्यानंद भिसे 
रायगड (Raigad) जिल्हा म्हटले की शेतकरी कामगार पक्ष, असे समीकरण आहे. कालपर्यंत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये शेकापसाठी या जिल्ह्यात न मागता जागा सोडल्या जात होत्या, पण यंदा महाविकास आघाडीतील घटक पक्ष उबाठाने रायगडमधील जागांवर दावा केला आणि शेकापमध्ये नाराजी सुरू झाली, अखेर शेकापने मविआमधून बाहेर पडत रायगडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७ पैकी उरण, कर्जत, पेण या तीन मतदारसंघात शेकापने उमेदवार उभा केल्याने मविआला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. पण महायुतीमध्ये सर्व आलबेल असले तरी अलिबाग आणि कर्जत येथे महायुतीचा बंडखोर असल्याने महायुतीलाही कष्ट घ्यावे लागणार आहेत.

रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड (Raigad)  जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ३, भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि अपक्ष १ उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत.

कुणाची कुठे बंडखोरी? 

रायगड (Raigad) जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. पेण, उरण, कर्जतमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाली झाली आहे. तर, अलिबाग, कर्जत मतदारसंघात महायुतीत बंडाळी आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आपले वर्चस्व कायम राखतात की, महाविकास आघाडी त्यांना धोबीपछाड देणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. रायगड (Raigad)  जिल्ह्यात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, कर्जत, उरण आणि पनवेल हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. सातही ठिकाणचे आमदार  सत्ताधारी पक्षांत असून, शिंदेसेना ३, भाजप २, अजित पवार गट १ आणि १ अपक्ष आमदार असून, तो सध्या भाजपमध्ये आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. उबाठाचे पेण, उरण, कर्जत, पनवेल आणि महाड या मतदारसंघांत उमेदवार रिंगणात उतरले आहेत. शेकाप आणि उबाठा यांच्यात समेट झाली असला तरी अलिबाग वगळता पेण, पनवेलमध्ये उबाठाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. तर, शेकापने उरणमधून अर्ज मागे  घेतलेला नाही. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीत तणाव निर्माण झालेला आहे. अलिबागमध्ये बंडखोर अपक्ष उमेदवाराने महायुतीच्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण केले आहे. कर्जत मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने महायुती उमेदवारासमोर आव्हान निर्माण  केलेले आहे.  त्यामुळे महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्हींमध्ये बंडखोरी झाली असल्याने कोण विजयी होणार आणि कोण चारीमुंड्या चीत होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

अशी आहे उमेदवारांची

  • पनवेल – प्रशांत ठाकूर (महायुती भाजप), बाळाराम पाटील (मविआ शेकाप), योगेश चिले (मनसे)
  • उरण विधानसभा – महेश बालदी (महायुती भाजप), मनोहर भोईर (मविआ ठाकरे गट), प्रितम म्हात्रे (शेकाप), सत्यवान भगत (मनसे)
  • कर्जत विधानसभा – महेंद्र थोरवे (महायुती शिंदे गट), नितीन सावंत (मविआ ठाकरे गट), सुधाकर घारे (अपक्ष) बंडखोरी महायुती
  • अलिबाग विधानसभा – महेंद्र दळवी (महायुती शिंदे गट), चित्रलेखा पाटील (मविआ शेकाप), दिलीप भोईर (अपक्ष) बंडखोरी भाजप
  • पेण विधानसभा – रवींद्र पाटील (महायुती भाजप), प्रसाद भोईर (मविआ उबाठा), अतुल म्हात्रे (शेकाप)
  • श्रीवर्धन विधानसभा – आदिती तटकरे – (महायुती अजित पवार गट), अनिल नवगणे (मविआ श.प. राष्ट्रवादी), फैसल पोपेरे (मनसे)
  • महाड विधानसभा – भरत गोगावले (महायुती शिंदे गट), स्नेहल जगताप (मविआ ठाकरे गट)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.