हिवाळी अधिवेशनाची धुरा जुन्या मंत्र्यांच्याच हाती; मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर?

91
राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार हिवाळी अधिवेशनापूर्वी करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी हा विस्तार पुन्हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपाच्या गोटात तशा चर्चा आहेत. त्यामुळे १९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण धुरा जुन्या मंत्र्यांच्याच खांद्यावर राहणार आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाकडून ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी अनेकजण नाराज झाल्याने पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात सामावून घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक आणि पदे कमी असल्याने शिंदेंसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी आमदारांची नाराजी पुन्हा उफाळून येऊ नये, यासाठी आमदारांना पुन्हा गुवाहाटीला नेण्याचे नियोजन शिंदे गटाकडून करण्यात आले आहे.

गुवाहाटी दौऱ्याचे गुपित काय?

  • बाळासाहेबांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री, आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. देवीच्या दर्शनासाठी हा दौरा नियोजित केला असला, तरी नाराजांची मनधरणी करण्यासाठी ही जागा निवडण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
  • आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाकोणाला संधी दिली जाईल, याबाबत शिंदे तेथे माहिती देतील. त्यानंतर जे नाराजी व्यक्त करतील, त्यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून मनधरणी करण्याचा प्रयत्न होईल. काहींना चांगल्या महामंडळाचे आश्वासन, तर काहींना संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल.
  • आमदारांची नाराजी दूर करण्यात शिंदे यशस्वी ठरले, तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. पण, ‘बंडोबा’ शांत झाले नाहीत, तर दुसऱ्या टप्प्यातील विस्तार आणखी लांबवण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.