राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ‘अर्थ’सह महत्त्वाची खाती देण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. मात्र, पवार ‘अर्थ’ खात्यावर ठाम आहेत. त्यामुळे खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्तारही रखडला असून, हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीश्वरांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी शिंदे-फडणवीस-पवार दिल्लीला जाणार आहेत.
अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन ११ दिवस लोटले, तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. आमचा शपथविधी झाल्याशिवाय खातेवाटप करू नका, अशी शिवसेनेच्या आमदारांची आग्रही भूमिका आहे. भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू अशा काही आमदारांनी थेट माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवाय, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्त्वाची (वजनदार) खाती देण्यास भाजपाच्या आमदारांचाही विरोध आहे.
(हेही वाचा – मिथून चक्रवर्ती, सौरव गांगुली यांना ‘खो’; भाजपने जाहीर केली तीन उमेदवारांची यादी)
मात्र, अजित पवार अर्थसह जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, उत्पादन शुल्क, अन्न आणि औषध प्रशासन, महिला आणि बालविकास, सामाजिक न्याय आदी खात्यांवर ठाम आहेत. शपथविधी घेण्याआधी भाजपाच्या नेत्यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमित शहांसमोर खातेवाटपाचा तिढा सोडवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community