27 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होणारे हे पहिलेच अधिवेशन असून यावेळी विरोधक शिंदे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतील. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, अधिवेशनापूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
15 दिवसांत होणार मोठा पक्षप्रवेश
अधिवेशनापूर्वी मोठी उलथापालथ होणार असून, ठाकरे गट वगळता इतर पक्षातील 10 ते 15 आमदार फुटतील असा खळबळजनक दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ माजली आहे. मात्र,यावेळी त्यांनी शिंदे गटातील 20 ते 25 आमदार इकडे तिकडे झाले तरी सरकार मजबूतीने पूर्ण काम टिकेल असाही दावा बच्चू कडू यांनी केला आहे. पक्षप्रवेश आणि न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख नेहमी पुढे जात आहे. मात्र, पुढील 15 दिवसांत अधिवेशनाच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होईल, असे सूचक वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.
( हेही वाचा: नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; कोणा-कोणाची उपस्थिती )