राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुंबईतबाबत केलेल्या वक्तव्याची तक्रार केंद्राकडे करणार असल्याचे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे राज्याचा अपमान असल्याचे, केसरकरांनी म्हटले आहे.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशी विधाने पुन्हा येऊ नयेत, अशी सूचना केंद्राने द्यावी, यासाठी पत्र लिहिणार असल्याचे, केसरकरांनी सांगितले. तसेच, मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठी वाटा मराठी माणसांचा आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत, मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचेही मोठे योगदान आहे, असे केसरकर म्हणाले. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर, त्या समाजाने पैसा काढला तर मुंबईत काही राहणार नाही, असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौ-यावरुन मुंबईत आल्यानंतर, सगळे आमदार त्यांना भेटणार आहोत, असे केसरकर म्हणाले.
( हेही वाचा: “गुजराती आणि राजस्थानी यांच्यामुळेच मुंबई आर्थिक राजधानी”; राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य )
नेमक काय म्हणाले राज्यपाल?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वक्तव्य भगतसिंह कोश्यारींनी केले आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठे योगदान आहे, असे राज्यपाल म्हणाले.