मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना झाली. या बंडानंतरही शिंदे गटात इनकमिंग सुरू असून ठाकरे गटात हळूहळू गळती होत आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटासोबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीने हातमिळवणी करून युती जाहीर केली. आगामी निवडणुकांपूर्वी ठाकरे गट रिकामा होण्याचे प्रतिपादन शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांनी केलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या इशाऱ्यावरुन संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलल्याचं गौप्यस्फोट जाधवांनी माध्यमासोबत बोलताना केला.
बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा नवीन गौप्यस्फोट केला आहे. जाधव म्हणाले की, ‘ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलेला आहे. शरद पवारांच्या इशाऱ्यावरून राऊत हे करत असल्याचं त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसत आहे. राऊतांनी उद्धव ठाकरेंच्या मागचं सैन्य रिकामी केलं आहे. आता शिल्लक सेना राहिली आहे. तीही काही दिवसांत आमच्यात (शिंदे गटात) विलीन होईल. जसंजशा निवडणुका जवळ येतील, तसंतसा शिल्लक राहिलेला ठाकरे गट संपूर्ण रिकामा झालेला दिसेल.’
ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACBची नोटीस
ठाकरे गटाचे राजन साळवी, वैभव नाईक यांच्यानंतर ठाकरे गटाचे तिसरे आमदार नितीन देशमुख यांना संपत्तीच्या चौकशीसाठी एसीबीनं नोटीस जारी केली आहे. या नोटीसीच्या माध्यमातून नितीन देशमुखांना १७ जानेवारीला अमरावती परिक्षेत्र कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान एकापाठोपाठ एक आमदारांना तपास यंत्रणेच्या नोटीसी येत असल्यानं ठाकरे गटात खळबळ माजली आहे.
(हेही वाचा – दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट)
Join Our WhatsApp Community