शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यानं राऊतांना फटकारलं, ‘त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत, आम्ही तर…’

133

विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेकदा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला. त्यांनी विधानसभेत अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. मात्र सत्तेत बसल्यावर विरोधकांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहेत, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर कुठलेही प्रकरण काढायचे आणि हंगामा करायचा, अशी विरोधकांची निती आहे. आमच्याकडे मोठे बाॅम्ब आहेत, ते आम्ही योग्य वेळेला बाहेर काढू, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. अशातच शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय गायकवाड

संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत. नागपुरात असताना राऊत म्हणाले होते की, आम्ही बॉम्ब फोडू, ते काय बॉम्ब फोडणार, त्यांच्या लवंगी फटाक्याने कुत्रही पळत नाहीत. आम्ही तर वाघ आहोत, असे संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना गायकवाड म्हणाले. शिंदे-भाजप सरकार फेब्रुवारी महिन्यात पायउतार होईल, असे राऊत म्हणाले होते. मात्र शिंदे सरकार पडण्याच्या त्यांच्या घोषणा या केवळ स्वप्नच राहतील. तर आमचं सरकार ही टर्म पूर्ण करून पुढचीही १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वासही संजय गायकवाड यांनी नागपुरात राऊतांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.

(हेही वाचा – iNCOVACC नेझल वॅक्सिनची किंमत ठरली; मोजावे लागणार इतके पैसे)

विधान परिषदेत सोमवारी उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. सीमाप्रश्नाचा मुद्दा ठाकरेंनी लावून धरला आणि आमच्याकडे अजून खूप बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हटले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी साधलेल्या निशाण्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपात फार तथ्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. तसेच विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे बॉम्ब नाहीत तर लवंगी फटाके असल्याचा टोमणा फडणवीस यांनी लगावला.

आज, मंगळवारी अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी वारकऱ्यांचा वेश धारण करत भजन म्हणत सरकार विरोधात आंदोलन केले. यावर संजय गायकवाड यांनी टीका केली आहे. एकीकडे देवी-देवतांचा अपमान करायचा आणि त्याच आघाडीच्या नेत्यांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत इथे यायचे, ही किती विटंबना आहे? महाराष्ट्र वेडा आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.