काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर भाजपने काँग्रेसचे भारत जोडो आंदोलन बंद करण्याची मागणी केली असताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाच्या नेत्या, शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
(हेही वाचा – राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांची पोलिसांत तक्रार, केली अटकेची मागणी)
राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले होते. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही, असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने देखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंवि कलम 500 आणि 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही याबाबत निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर गुरूवारी संध्याकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community