राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गटाच्या नेत्यांवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. शिंदे गटातील आमदारांना 50 खोके मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. पण आता यावरुन शिंदे गटाने मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे,विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या अपमानाप्रकरणी आपण मानहानीचा दावा ठोकू शकतो, असा इशारा शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी दिला आहे.
कायदेशीर कारवाईचा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांना भाजपकडून 50 खोके मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे समर्थक आमदार हे टीकेचे धनी झाले आहेत. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिलेल्या प्रत्युत्तरात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे हा आरोप-प्रत्यारोपांचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात येत आहे.
(हेही वाचाः शिंदे-फडणवीस सरकार ‘या’ मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता)
सुप्रिया सुळेंना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी खोक्यांवरुन टीका केली. त्यावरुन विजय शिवतारे यांनी त्यांना सवाल केला आहे. पहाटेच्या शपथविधी वेळी अजित पवार यांनी किती खोके घेतले हे सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे. तसेच 1978 साली राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी 38 आमदार फोडले होते, त्यावेळी पवारांनी किती खोके दिले हे देखील सुप्रिया सुळे यांनी जनतेला सांगावे, असे आवाहनही शिवतारे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community