शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांच्यात आता एक नवा वाद सुरू झाला आहे. निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता केसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मला जर केंद्रीय मंत्री नारायण यांच्यासोबत काम करायचं असेल तर मी थेट राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी मी का बोलू?, असा सवाल करत केसरकर यांनी निलेश राणे यांना टोला लगावला आहे.
मी तेवढा ज्येष्ठ आहे
नारायण राणे यांची मुलं कसं बोलतात त्याबाबत काळजी घेण्यासाठी नारायण राणे हे स्वतः समर्थ आहेत. मला जर सिंधुदुर्गाच्या हितासाठी उद्या जाऊन राणेंसोबत काम करायचं असेल तर मी थेट नारायण राणे यांच्याशी बोलेन, त्यांच्या मुलांशी का बोलू? मी वयाने आणि अमुभवाने तेवढा ज्येष्ठ आहे, मी जवळजवळ राणेंइतका मोठा आहे. अनेक वर्ष राजकारणात सक्रीय असल्यामुळे नारायण राणे यांच्या व्यक्तिमत्वात एक मॅच्युरिटी आहे. त्यामुळे त्यांच्याव्यतिरिक्त मी इतर कोणाशीही बोलू इच्छित नाही, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘तुमचा हाच अॅटिट्यूड असेल तर मी यापुढे बोलणार नाही’, शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांची भूमिका)
राणेंशी व्यक्तिगत वैर नाही
नारायण राणे यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही हे मी अनेकदा जाहीरपणे सांगितलं आहे. पण ज्याप्रकारे त्यांच्याकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून वक्तव्य केली जातात त्यावर माझा आक्षेप आहे. ज्याक्षणी हे संपेल तेव्हा आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community