माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देताना दिसत आहेत. आता ठाण्यात जाऊन मुख्यमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची भाषा आदित्य ठाकरेंनी केली आहे. आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना वरळी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे दोन बिनीचे शिलेदार आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे आगामी काळात शिंदे गटात प्रवेश करू शकतात, असा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी याच दोन नेत्यांच्या छाताडावर पाय देऊन राजकारणाची पहिली पायरी चढल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी यावेळी केले.
नक्की काय म्हणाले संजय शिरसाट?
प्रसार माध्यमांसोबत बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘अहंकाराचं भूत त्यांच्या मानगुडीवर बसलं आहे. आमदार गेले तरी अहंकार गेला नाही. सत्ता गेली तरी अहंकार कमी होत नाही. पक्ष संपत चाललाय तरी अहंकार कमी होत नाही. हा सर्व अहंकार वाढवण्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका आहे, त्यात संजय राऊत पेट्रोल टाकून वटवतायत. म्हणून आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्त्व देण्याचं कारण नाही.’
वरळी मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा नाही
पुढे शिरसाट म्हणाले की, ‘राजकारणाची सुरुवातच त्यांनी दोन चांगल्या कार्यकर्त्यांच्या छाताडावर पाय ठेवून केली. वरळी हा काय त्यांचा मतदार संघ नाहीये. परंतु तिथे असलेले सचिन अहिर असेल किंवा सुनिल शिंदे असेल. यांच्या छाताड्यावर पाय देऊन आदित्य ठाकरे राजकारणाची पहिली पायरी चढल्याचे ते विसरलेत. म्हणून त्यांच्या आव्हानांना महत्त्व देण्याचं कारण नाहीये. राजकारणाची एक निवडणूक लढवली म्हणून आपण सर्व काही जिंकलं, असं त्यांना वाटतं. आमच्या सारखे कार्यकर्ते ज्यांनी अनेक निवडणुका जिंकलेत तरी आमच्यात हा कधी अहंकार आला नाही.
(हेही वाचा – दादा, मी राजीनामा दिला; वाढदिवसाच्या दिवशी थोरातांची अजित पवारांना फोनवरुन माहिती)
ठाकरे गटाच्या सभा म्हणजे डोंबाऱ्याचा खेळ
ज्या त्यांच्या सभा चालल्या आहेत हा डोंबाऱ्याचा खेळ आहे. त्या रशीवरचे फक्त पात्र बदलतात. कधी भास्कर जाधव, कधी सुषमा अंधारे तर कधी आदित्य ठाकरे. हे लोकं त्या रशीवर उड्या मारतात आणि लोकांनी टाळ्या वाजल्या की यांना असं वाटतं आपल्याला दाद मिळाली. काही दिवसं चालणार हे नाटकं आहे. काही दिवसांनी ते बंद पडेल, मग त्यांना कळेल आपण आता जमिनीवर राहिलं पाहिजे, असं शिरसाट म्हणाले.
Join Our WhatsApp Community