‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही, संजय कदमांची ही राजकीय आत्महत्या’

243

२०१३ साली शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले नेते आणि माजी आमदार संजय कदम रविवारी, २२ जानेवारीला शिवसेनेत घरवापसी करत आहेत. ठाकरे गटाने कदम पिता पुत्रांची कोंडी करण्यासाठी ही व्यूहरचना आखल्याचे म्हटले जात आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारेच्या उपस्थितीत संजय कदम शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवरून रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे नेते, आमदार योगेश कदम माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरेंवर बसरले आहेत. ‘आजवर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही नेत्याला मोठे होऊ दिले नाही. संजय कदमांनी ठाकरे गटात जाणे ही त्यांची राजकीय आत्महत्या असेल’, असे योगेश कदम म्हणाले.

या निर्णयामुळे मला राजकीय फायदा होणार – योगेश कदम

रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर शनिवारी माध्यमांसोबत बोलताना योगशे कदम म्हणाले की, ‘ही बातमी माझ्यासाठी धक्कादायक किंवा नवीन नाही. २०१९पासून अनिल परब माजी आमदार सुनील कदम यांना शिवसेनेत घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळेस मला तिकिट मिळू नये असेही प्रयत्न होत होते. निवडणूक आल्यानंतर देखील तिथे माजी आमदार संजय कदम यांना ताकद देण्याचे काम अनिल परब करत होते. राष्ट्रवादी सोडून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याच्या निर्णयामुळे मला राजकीय फायदा होणार आहे. खरंतर ही त्यांची राजकीय आत्महत्या असणार आहे. कारण उद्धव ठाकरेंनी आजवर कोणत्याही नेत्याला कधीच मोठे होऊ दिले नाही.’

उद्धव ठाकरेंची खालच्या पातळीला जाण्याची तयारी – योगेश कदम

दरम्यान ज्यावेळी २०१३ साली संजय कदम यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, त्यावेळेस त्यांनी भगवा ध्वज जाळला होता. एवढेच नाहीतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे बॅनरही फाडले होते. आता अशाच नेत्याला उद्धव ठाकरे पुन्हा पक्षात घेण्यास तयार झाले आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंची सूड उगवण्यासाठी खालच्या पातळीला जाण्याची तयारी आहे, अशी टीका योगेश कदमांनी ठाकरेंवर केली आहे.

(हेही वाचा – शरद पवार नेहमी फोन करतात; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.