सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी राहुल शेवाळेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप

150

अभिनेता सुशांत सिंह राजपूत संशयित मृत्यूप्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभेत बोलताना राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘एयू’नावाने 44 फोन कॉल आले होते. ‘एयू’ म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असे बिहार पोलिसांनी सांगितले आहे, असा गंभीर आरोप केला. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होत आले आहेत. त्यातच आता राहुल शेवाळे यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे अधिकृत करणार, फडणवीसांची घोषणा)

या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआयकडून करण्यात आली. मात्र, तिन्ही यंत्रणांच्या अहवालात तफावत आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘एयू’अशा नावाने ४४ कॉल आले होते. या ‘एयू’बाबत मुंबई पोलिसांनी वेगळा अहवाल दिला होता. तर बिहार पोलिसांनुसार ‘एयू’ म्हणजे ‘आदित्य उद्धव’ आहे. सीबीआयने ‘एयू’बाबत अहवाल दिलेला नाही. त्यामुळे रिया चक्रवर्तीला कॉल केलेला ‘एयू’ नक्की कोण याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी शेवाळेंनी लोकसभेत केली आहे. शिंदे गटातील नेत्यानेच उद्धव ठाकरे यांच्या मुलावर आरोप केल्याने आता राज्यात नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

लोकसभेत बुधवारी अंमलीपदार्थविरोधी धोरणावर चर्चा सुरू होती. या चर्चेत राहुल शेवाळेंनीही सहभाग घेतला. याच मुद्द्यावर त्यांनी ड्रग्जविरोधी कारवाई फक्त सेलिब्रिटींविरोधात होते, इतर प्रकरणात कारवाई होत नाही, असा दावा केला. तसेच सुशांतसिंह राजपूत प्रकरणातही ड्रग्जचा मुद्दा उपस्थित झाला होता. या प्रकरणाची चौकशी एनसीबीसह सीबीआयकडून केली जात आहे. सीबीआयची चौकशी कुठवर आली आहे, सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या का, बिहार पोलिसांनी सांगितल्याप्रकारे रियाला आदित्य उद्धव ठाकरेंचा फोन आला होता का, याबाबतही त्यांनी प्रश्न विचारले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.