शिंदे गट आता शिवसेना पक्षावर दावा ठोकण्याची चर्चा आहे. शिवसेना भवनावरही ते दावा ठोकू शकतील, असेही बोलले जात आहे. यावरुन आता संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. फुटीर गटाचे काय सांगता, ते चंद्रावरही कार्यालय स्थापन करतील, शिवसेना भवनच काय सामना आणि मातोश्रीचाही ताबा मागतीलच तसेच ते उद्या जो बायडन यांच्या घरावरही हक्क सांगतिल, असे वक्तव्य राऊत यांनी केले. नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते.
12 खासदारांची मजबुरी आम्हाला माहितीय
संजय राऊत म्हणाले की, हा गट उद्या जो बायडेनचेही घर ताब्यात घेईल. 10 डाऊनिंग स्ट्रीटला जातील. तिथेही ताबा घेतील. एवढा मोठा पक्ष आहे त्यांचा .. बाळासाहेब ठाकरेंचा मुळ पक्ष आमचाच आहे. किंबहुना आम्हीच त्यांना पक्षात आणलं आहे, असही सांगायला कमी करणार नाहीत. उद्धव ठाकरे यांना आम्हीच पक्षप्रमुख केलं.. असही ते म्हणतील. महाराष्ट्रात लोकशाहीचे जे चित्र दिसत आहे, त्याबद्दल विचारही करु शकत नाही. त्यांनी जी लढाई लढायची आहे, ती लढू द्या. तसेच, 12 खासदारांचा फुटीर गट भाजपच्या प्ररेणेने आम्हाला सोडून गेला. ते कालपर्यंत आमचे मित्र होते. आजही मी त्यांना मित्र मानतो. कोणत्या मजबुरीतून त्यांनी आम्हाला सोडलं हे आम्हाला माहिती आहे. प्रत्येकाची वेगळी मजबुरी आहे. हिंदुत्व, युती हे तोंडी लावायला आहे.
( हेही वाचा: शिवसेना भवन नक्की कुणाचे? )
संजय राऊतच जबाबदार
शिवसेनेतून बाहेर पडलेले आमदार आणि खासदार शिवसेनेतील फुटीसाठी संजय राऊत जबाबदार असल्याचे, वारंवार सांगत आहेत. यावर उत्तर देताना, संजय राऊत म्हणाले, 2014 साली संजय राऊत कुठे होते? जेव्हा भाजपने युती तोडली. तेव्हा राऊत त्या चित्रात कुठे होते. 2019 साली भाजपसोबत युती तोडली. तेव्हा राऊत कुठे होते, याचे उत्तर त्यांनी द्यावे. या काळात घडलेल्या घटनांना जबाबदार कोण, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे सवाल राऊत यांनी शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना विचारले आहेत.
Join Our WhatsApp Community