‘जोपर्यंत एकनाथ शिंदे नावाचा वाघ आहे तोवर हिंदुत्वाला जाग आहे’,शिंदे गटाचे बाळासाहेबांना भावनिक पत्र

126

दसरा मेळाव्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू असतानाच आता शिंदे गटाकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावनिक पत्र लिहिण्यात आलं आहे. या पत्रातून अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे नावाचा वाघ आहे तोवर हिंदुत्वाला जाग आहे, असे या पत्रातून म्हटले आहे.

…तोवर हिंदुत्वाला जाग आहे

आम्ही तुमचा ज्वलंत हिंदुत्ववादाचा वारसाच पुढे घेऊन जात आहोत. या खडतर मार्गावर तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत याची खात्री आहेच. साहेब तुम्ही म्हणाला होतात माझ्या मावळ्यांनो,काँग्रेसी कबुतराची नाही हिंदवी गरुडाची भरारी घ्या. तुमच्या विचारांशी प्रतारणा करणा-या काँग्रेसी लांडग्यांच्या कळपातून वाघ आता बाहेर आलाय. बाळासाहेब एकनाथ शिंदे नावाचा वाघ आहे तोवर हिंदुत्वाला जाग आहे. आपण आमच्या रक्तात होता,आहात आणि राहालच, असे या पत्रातून म्हटले आहे.

ऐकून घेणारा कान उरला नाही

साहेब तुम्ही कधीही खुर्चीचा मोह धरला नाही. पण तुम्ही गेलात आणि तुम्ही आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केलात त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचं संधान जुळलं. तुमच्या अटकेचा प्रयत्न करणा-यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली. साहेब असं करू नका हे आम्ही त्यावेळीही धाय मोकलून सांगत होतो, पण आमचं ऐकून घेणारा कानच उरला नव्हता हेच आमचं दुर्दैव, असं या पत्रात म्हटलं आहे.

संभाजीनगर नामांतर होऊ शकलं नाही

तरीही आपले साहेब मुख्यमंत्री झाले याचं समाधान आणि आता सुराज्य साकार होईल अशी आशा होती. पण झालं ते विपरीतच.1992 च्या दंगलीत तुम्ही होतात म्हणून शिवसेना वाचली. पण त्रिपुरामधल्या तथाकथित घटनेवरुन अमरावतीत दंगल उसळली तरीही शिवसेना शांतच. संभाजीनगरच कायदेशीर नामांतर व्हावं ही तुमचीच इच्छा होती पण आपलं सरकार असूनही ही इच्छा पूर्ण होताना दिसेना, अशी खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

(हेही वाचाः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, गुप्तचर यंत्रणेची माहिती)

विचारांचा वारसा पुढे नेणार

मुंबईच्या जीवावर उठलेल्या दाऊदचं मंत्र्यांशी असणारं कनेक्शन सिद्ध झालं,तरीही शिवसेना शांतच. शिवसेना नेतृत्वाचा शंढासारखा थंडपणा तुम्हालाही बघवला नसेलच. मालमत्तेच्या वारशापेक्षा विचारांचा वारसा जास्त महत्वाचा असतो म्हणूनच आपला वारसा पुढे नेण्याचा निर्णय आम्ही घेतला. शेवटी किती दिवस तुमचे विचार की आपल्या संघटनेची गळचेपी मुकाट्यानं सहन करणं या द्वंव्दात आम्ही अडकून रहायचं, असा भावनिक सवालही करण्यात आला आहे.

निष्ठेच्या अग्निपथावर माघार नाही

या सगळ्यात स्वतःची टिमकी वाजवणारे नेते मूग गिळून गप्प बसले होते याचंच वाईट वाटतं. पण आमची निष्ठाच नव्हे तर आमचा जन्मही आम्ही तुमच्या पायांवर वाहिला आहे. आणि निष्ठेच्या अग्निपथावर माघार नसते, असतं ते फक्त भविष्य. तुम्ही जाताना शिवसेनेचं हेच भविष्य आमच्या हाती सोपवून निर्धास्त मनाने गेला होतात आणि आता तेच भविष्य आता धोक्यात आलं होतं.

निष्ठा लाचारांशी नाही,विचारांशी

अन्यायाविरुद्ध पेटून उठा,संघर्ष करा आणि जिंका या तुमच्या शिकवणीला आम्ही जागलो. शिवसेना हा आमचा प्राण आहे त्यामुळे आम्ही शिवसेना सोडणं कदापि शक्यच नाही. म्हणूनच आपली शिवसेना आम्ही जागती ठेवत आहोत. तुमच्या आणि धर्मवीरांच्या विचारांवर चालणारं युतीचं सरकार आलंय, एकनाथ शिंदेंच्या रुपाने धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीतला तुमचा ढाण्या वाघ महाराष्ट्रात शिवराज्य साकारतोय. आपला शिवसेना धर्म पुन्हा नव्या दमानं फुलतोय. आता काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आमची निष्ठा लाचारांशी नाही,विचारांशी आहे, असे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

(हेही वाचाः ‘तुम्ही गेलात आणि शिवसेनेचा वाघ मॅटिनी शोमधला झाला’, शिंदे समर्थकांचं बाळासाहेबांना भावनिक पत्र! उद्धव ठाकरेंवर टीका)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.