प्रत्येक वास्तूला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची घाई, आता शिवसेना नेत्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. समाजकल्याण केंद्र तथा महिला आधार केंद्राला चक्क हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. परंतु ही चूक लक्षात येताच बाळासाहेबांच्या नावाऐवजी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यायचे, की माँसाहेबांचे याबाबतच्या गोंधळातच शिवसेनेचे नेते अडकल्याचे दिसून येत आहे.
शिवसेनेची मागणी
गोरेगाव पूर्व येथील जयकोच रोडवरील सुविधा भूखंडावर महापालिकेच्यावतीने समाज कल्याण केंद्र तथा महिला आधार केंद्र विकसित करण्यात आले आहे. स्थानिक शिवसेना नगरसेविका साधना माने यांच्या प्रभाग क्रमांक ५४ मधील या इमारतीचे काम पूर्ण झाल्याने, या वास्तूला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आधार केंद्र, असे नामकरण करण्याची मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली होती. या मागणीचा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीपुढे मंजुरीसाठी ठेवल्यानंतर, ८ जानेवारी २०२१ रोजी तो मंजूर करुन समितीने अभिप्रायसाठी प्रशासनाकडे पाठवून दिला होता.
(हेही वाचाः राणे आले, पण बाळासाहेबांना चाफ्याची फुले आणायला विसरले!)
शिवसैनिकांची घाई
बाळासाहेबांच्या नावाचा हा प्रस्ताव महिला व बाल कल्याण समितीत मंजूर झाल्यानंतर, शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी १० फेब्रुवारी २०२१ रोजी समिती अध्यक्षा राजराजेश्वरी रेडकर यांना पत्र पाठवून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आधार केंद्र ऐवजी, माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे महिला आधार केंद्र असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी केली. त्यामुळे माँसाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव २३ मार्च २०२१च्या समितीच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला. याला २८ जुलै २०२१ रोजी समितीने मंजुरी दिली. मात्र, अद्यापही महापालिकेची मंजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे एकाच वास्तूला आधी शिवसेनेचे नेते बाळासाहेबांचे नाव देण्याची घाई करतात आणि पुन्हा तीच मागणी मागे घेत माँसाहेबांच्या नावाची मागणी करतात. त्यामुळे शिवसेना नेत्यांची अती घाईच त्यांच्या अडचणीची ठरत असल्याचे दिसून येते.
(हेही वाचाः बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण)
Join Our WhatsApp Community