शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन, मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला

164

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. मात्र मेटे यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

रविवारी पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडकडून मुंबईकडे येत असताना मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात झाल्याची माहिती त्यांचे सहकारी आणि चालक एकनाथ कदम यांनी दिली. अपघात झाल्यानंतर तब्बल एका तासानंतर मदत मिळाली असल्याचं त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं आहे. या अपघातात गाडीचे नुकसान झाले असून मेटे यांचे स्वीय सहाय्यक आणि मेटे हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते मात्र यादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचं मोठं नुकसान झाल्याचे देखील काही राजकीय नेत्यांनी म्हटले आहे.

कोण होते विनायक मेटे

  • विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी आंदोलन केली.
  • अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते.
  • बीज जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे ते रहिवासी होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात ते आमदार होते. त्यानंतर सलग ५ टर्म विधानपरिषद सदस्य होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.