मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबाद येथे झालेल्या जाहीर सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. यानंतर आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु, राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर करणार आहेत. या दोघांच्याही दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मनसे- शिवसेनेत चांगलीच पोस्टरबाजी रंगली आहे. या पोस्टरबाजीचा वाद थेट अयोध्येत पोहोचला आहे. शिवसेनेने अयोध्येत पोस्टरबाजी करत राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरेंना पोस्टर्समधून टोला
शिवसेनेकडून अयोध्येत पोस्टरबाजी करण्यात आल्याचे सध्या सांगितले जात असून त्यावर असली आ रहा है, नकली से सावधान, असे लिहिलेले आहे. अयोध्येत हे पोस्टर्स शिवसेनेकडून ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना या पोस्टर्समधून टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राज ठाकरे ५ जून रोजी दाखल होणार असून त्यांच्या पूर्वी ते अयोध्येला धडकणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र तत्पूर्वीच या बॅनरबाजीद्वारे भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राज यांच्या माफीनाम्याची मागणी केली जात असताना आता शिवसेनेने राज ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर उत्तर प्रदेशातील भाजपा नेत्यांनीही राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपा खासदार ब्रीजभूषण सिंह यांनी दिला होता.
Join Our WhatsApp Community