हाणामारीनंतर शिवसेनेचा भाजपवर सोशल मीडियावरुन हल्ला

शिवसेना भवनमधून हाताळल्या जाणाऱ्या सोशल मीडियाने एकप्रकारे सोशल मीडियाचा अधिक वापर करणाऱ्या भाजपला त्यांच्याच अस्त्राने घायाळ केले आहे.

64

शिवसेना भवनवर मोर्चा नेणाऱ्या भारतीय युवा मोर्चातील पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्यानंतर आता सोशल मीडियावरुनही भाजपला शिवसेनेकडून डिवचले जात आहे. ‘शिवसेना भवनावर म्हणजेच आमच्या शक्ती स्थळावर जर चाल करणार असाल, तर थोबाड फुटणारच…’ अशा प्रकारचा एकच संदेश शिवसैनिकांनी सोशल मीडियावरुन व्हायरल करत, भाजपला ट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेनेकडून अशाप्रकारे एकच संदेश व्हायरल करुन प्रतिस्पर्ध्यांना डिचवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असून, शिवसेना भवनमधून हाताळल्या जाणाऱ्या सोशल मीडियाने एकप्रकारे सोशल मीडियाचा अधिक वापर करणाऱ्या भाजपला त्यांच्याच अस्त्राने घायाळ केले आहे.

(हेही वाचाः भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! )

मारहाणीची पक्षाकडून दखल

राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेने भाजपवर निशाणा साधत, चौकशीची मागणी केली. त्यानंतर संतापलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा निषेध करण्यासाठी दादर शिवसेना भवनासमोर फटकार मोर्चाचे आयेाजन केले. भाजप जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चातील पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, तिथून जाणाऱ्या माहिममधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी फटके दिले. या मारहाण प्रकरणाची दखल पक्षाच्या उच्च स्तरावर घेण्यात आली आहे.

 

(हेही वाचाः आधी हिंदुत्वासाठी विरोधकांना नडले, आता एकमेकांनाच भिडले!)

असा दिला सोशल मीडियावरुन चोप

या मारहाणीनंतर, सोशल मीडियावरुनही शिवसेनेने भाजपवर हल्ला चढवला आहे. प्रत्येक शिवसैनिकांनी एकच संदेश व्हायरल करत भाजपला एकप्रकारे डिवचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ‘शिवसेना भवनावर म्हणजे आमच्या शक्तीस्थळावर जर चाल करणार असाल, तर थोबाड फुटणारच’ असा एकच संदेश व्हायरल केला जात आहे.

 

Screenshot 20210616 225927 Facebook

तर काही शिवसैनिकांनी हा संदेश कायम ठेवतानाच, ‘फटकार मोर्चा काढायला आले होते, पण आमच्या सेनाभवनावर फटके खाऊन गेले’, अशाही अतिरिक्त ओळी जोडून संदेश व्हायरल केला.

Screenshot 20210616 225704 Facebook

काहींनी दादर-माहिम परिसरातील भाजप कार्यालय तडकाफडकी बंद, शिवसैनिकांच्या भीतीने, अशाही पोस्ट केल्या.

Screenshot 20210616 225750 Facebook

तर काहींनी ठोकणार म्हणजे ठोकणारच, शिवसेना झिंदाबाद, अशाही पोस्ट करत भाजपला इशारा दिला. तर काहींनी हा महाराष्ट्र आपला आहे, इथे आवाज पण आपलाच असणार, अशा पोस्ट करत भाजपवर हल्ला चढवला.

Screenshot 20210616 225528 Facebook

भाजपनेही दिले प्रत्त्युत्तर

मात्र, शिवसेनेकडून प्रत्यक्ष मारहाण केली गेल्यानंतरही सोशल मीडियावरील हल्ला सुरुच असून, एकप्रकारे हा भाजपला डिवचण्याचा प्रयत्न असूनही भाजपही शांत होती. मात्र, आता भाजपकडून सोशल मीडियावरुन त्यांच्या पोस्टना प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने, बाळासाहेबांच्या शिवसेनेने हिंदुंवर हात उचलला नव्हता. महिलांवर तर मुळीच नाही. श्रध्देय बाळासाहेबांचे नाव घ्यायचा अधिकार यांना नाही, अशा पोस्ट भाजपने केल्या आहेत. तर अन्य एका भाजप पदाधिकाऱ्याने तर हा देश पण आमचा आहे, महाराष्ट्र पण आमचा आहे आणि मुंबई महापालिका पण आमची आहे! यापुढे आमचा आवाज घुमणार, अशा पोस्ट करत शिवसेनेला प्रत्युतर दिले आहे.

(हेही वाचाः देशात लोकशाही, दंडुकेशाही चालणार नाही! चंद्रकांत पाटलांनी ठणकावले)

ती मारहाण हतबलतेपोटीच

मुंबईत आजवर कधीही शिवसेना भवनवर चाल करुन येण्याची हिंमत कधी कोणी दाखवली नाही. विशेष म्हणजे भाजप युवा मोर्चाने एक दिवस आधीच घोषणा करुनही सेना भवनवर चाल करुन दाखवली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली असली, तरी शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना मात्र हा प्रकार आवडलेला नाही. भाजप युवा मोर्चाचा हा मोर्चा सेना भवनाच्या १०० मीटर परिसरातही धडकायला नको होता. जेव्हा भाजपचे पदाधिकारी आंदोलन करायला येणार होते, तेव्हाच शिवसैनिकांनी त्यांना अडवून किंवा त्याआधीच तिथून पिटाळून लावले पाहिजे होते. परंतु ते आंदोलन करुन गेले. सेना भवनवर त्यांनी यशस्वीपणे चाल केली आणि आंदोलन करुन गेल्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे, म्हणजे एकप्रकारे शिवसैनिकांचे अपयश आहे. हाच प्रकार जर आंदोलनापूर्वी केला असता, तर शिवसेना भवनवर आजवर जो कोणालाही मोर्चा काढता आलेला नव्हता, ती प्रथा कायम राहिली असती. त्यामुळे झालेली मारहाण ही केवळ शिवसैनिकांनी आपली अब्रू राखण्यासाठी केली असल्याच्या प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून व्यक्त होताना दिसत आहेत.

(हेही वाचाः भाजपचा शिवसेनेविरोधात फटकार मोर्चा! सेना भवनसमोर राडा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.