शिवसेनेनं मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपचा घाणाघात

निवडणुकीनंतर मालमत्ता कर १५ टक्क्यांनी वाढेल; आयुक्त चहल यांची कबुली

115

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्थायी समितीत अर्थसंकल्प सादर करताना यंदाच्या मालमत्ता करात वाढ करणार असल्याचे कोणतेही सूतोवाच केले नव्हते. मात्र, आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यंदा मालमत्ता करात १५ टक्के वाढ करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मोठी भीमगर्जना करत करवाढ झाली नसल्याचे म्हणणाऱ्या शिवसेनेने आता कोलांटी उडी मारली असून सर्वसामान्य मुंबईकरांचा विश्वासघात करत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांनी केले आहे अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेनेने केली सामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक

महापालिका आयुक्तांचे हे वर्तन कायदा प्रथा-परंपरा आणि लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे असून शिवसेनेने सर्वसामान्य मुंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. त्यांना जनता निवडणुकीत उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आयुक्तांच्या मनमानी वर्तणुकीला भारतीय जनता पक्ष तीव्र विरोध करेल असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार राजहंस सिंह यांनी दिला. यावेळी स्थायी समिती सदस्य, पक्ष नेता विनोद मिश्रा उपस्थित होते.

(हेही वाचा – “राऊतांचा मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा घोटाळा”, काय म्हणाले सोमय्या?)

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार का?

सनदी अधिकाऱ्यांनी कायद्याचे संरक्षण करणे अभिप्रेत आहे. मात्र, खुद्द महापालिका आयुक्तांकडून महापालिका व्यवस्था सुरक्षित चालवणे अपेक्षित असताना, तेच आज राजकीय भूमिका बजावून मुंबईकरांची फसवणूक करत आहेत. मुंबईकरांवर लादला जाणारा कर भारतीय जनता पक्ष कदापि सहन करणार नाही, असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला. एकीकडे आयुक्त ९० हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार असे म्हणतात. मात्र, पालिकेकडे फक्त १७ हजार ४४२ कोटींची तरतूद आहे. राखीव निधी आणि कर्ज घेऊन प्रकल्प कसे पूर्ण करणार? कचऱ्यावरती अप्रत्यक्षपणे कर लावून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणार का? शिवसेनेच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारची महापालिकेकडे येणे असलेली थकबाकी रुपये ६ हजार ७६८.१६ कोटी कधी येणार? असेही प्रश्न गटनेते शिंदे यांनी उपस्थित केले. मुंबईकरांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्नं वचननाम्यात दाखवले होते त्याचे काय पुढे काय झाले? दरवर्षी जल करात ८ टक्के वाढ कश्यासाठी? गारजाई, पिंजाळ योजना बासनात गुंडाळली असताना समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा अट्टाहास कशासाठी? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य योजना जुनीच असून या योजनेत १३९ आरोग्य सुविधा मोफत देण्याचे घोषित केले होते त्याचे पुढे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करत आमदार राजहंस सिंह यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.