शिवसेना भवन नक्की कुणाचे?

140
बाळासाहेबांची खरी शिवसेना ही आपलीच असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून आता दादर येथील शिवसेना भवनावरही दावा  केला जाईल, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या माध्यमातून उभारले गेले असले, तरी प्रारंभी शिवसेनेचे नेते असलेल्या या शिवाई ट्रस्टमधून अनेकांना बाजुला करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना भवनाचा ताबा हा केवळ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे असल्याचे, कागदोपत्री स्पष्ट होत आहे. महापालिकेच्या मालमत्ता पत्रकावर (प्रॉपटी कार्ड) उध्दव ठाकरे यांचेच नाव असल्याने, शिवसेना भवन हे ठाकरेंचेच असल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैंकी ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले असून, त्यापाठोपाठ १२ खासदार आणि माजी नगरसेवक व शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारीही शिंदे गटात सामील झाल्याने, शिवसेना ही एकनाथ शिंदेंची की ठाकरेंची असा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधी व पदाधिकारी आपल्याकडे असल्याने आपली मूळ शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उद्या शिंदे गटाकडून शिवसेना भवन आणि मातोश्रीवरही दावा केला जाईल, असा आरोप केला. शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवाई ट्रस्टची आणि विश्वस्तांची नोंद मालमत्ता पत्रकावर
शिवसेना भवनाची मूळ मालकी बाई हाजीनी झुलेखबाई सुलेमान यांची होती. त्यामुळे भाडे पट्ट्यावरील ही जमिन भाडेकरारावर बाई फजिलाबाई आणि ताहेरबाई ए गुलमोहम्मद यांच्याकडून शिवाई सेवा ट्रस्टने घेतली. प्रारंभी शिवसेनेचे पहिले महापौर बनलेले हेमचंद्र गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे शिवाई सेवा ट्रस्टचे विश्वस्त होते. या शिवाई ट्रस्टची आणि त्यांच्या विश्वस्तांची नोंद जागेच्या मालमत्ता पत्रकावर करण्यात आली होती.
New Project 2022 07 20T112234.570

मालमत्ता पत्रकावर उद्धव ठाकरेंचेच नाव

यातील देशमुख, शिर्के आणि देसाई यांनी राजीनामा दिला, तर गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक आदींचे निधन झाले. त्यानंतर जागेच्या मालमत्ता पत्रकारावर रविंद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांची विश्वस्तपदी नियुक्ती करत त्यांची नावे नोंदवण्यात आली आहेत. परंतु आता या मालमत्ता पत्रकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव चढवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांचे नाव मालमत्ता पत्रकावर 2021 मध्ये चढवण्यात आले असले तरी प्रत्यक्षात धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणीवर त्यांचे नाव लावण्यात आलेले नाही.
…म्हणून शिंदे गटाला दावा करता येणार नाही 
मात्र, जागेच्या मालमत्ता पत्रकावर ही नावे असली तरी आजीवन विश्वस्तपदासाठी राबण्याची योजना त्यामध्ये २०२१मध्ये उध्दव ठाकरे यांचे नाव धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी कार्यालयातील दस्तावेजात जोडण्यात आले आहे. तर रश्मी ठाकरे यांचे नाव 2016 मध्ये धर्मादाय अयुक्तांच्या नोंदणीवर चढवण्यात आले आहे. पण रश्मी ठाकरे यांचे नाव जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर चढवण्यात आलेले नाही. त्यामुळे मालमत्ता पत्रकावर उध्दव ठाकरे यांचे शेवटचे नाव असून, त्यामुळे शिवसेना भवनाचा पूर्णपणे ताबा हा उध्दव ठाकरेंकडे असल्याने, यावर शिंदे गटाला शिवसेना म्हणून दावा करता येणार नसल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.