मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा ताबा एकनाथ शिंदेंकडे गेल्यानंतर पक्षाचे मुख्यालय असलेल्या ‘शिवसेना भवन’वर हक्क कुणाचा, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाई सेवा ट्रस्टच्या जागेवर ही वास्तू उभी असल्याने तिच्यावर कुणीही हक्क सांगू शकत नाही, असा सर्वसामान्य शिवसैनिकांचा सूर आहे. मात्र, शिवाई सेवा ट्रस्ट केवळ नावापुरती असून, ‘शिवसेना भवन’वर उद्धव ठाकरेंची मालकी असल्याची धक्कादायक माहिती ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती लागली आहे.
‘शिवसेना भवन’ उभे असलेल्या जागेची मूळ मालकी बाई हाजीनी झुलेखबाई सुलेमान यांच्याकडे होती. भाडेपट्ट्यावरील ही जमीन भाडेकरारावर बाई फजिलाबाई आणि ताहेरबाई ए गुलमोहम्मद यांच्याकडून शिवाई सेवा ट्रस्टने घेतली. सुरुवातीला शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक, माधव देशपांडे, सुधीर जोशी, लिलाधर डाके, शाम जयंत देशमुख, कुसुम शिर्के, भालचंद्र देसाई हे या ट्रस्टचे विश्वस्त होते. शिवाई ट्रस्टची आणि त्यांच्या विश्वस्तांची नोंद या जागेच्या मालमत्ता पत्रकावर करण्यात आली होती.
यातील देशमुख, शिर्के आणि देसाई यांनी राजीनामा दिला, तर गुप्ते, मिनाताई ठाकरे, वामन महाडिक यांचे निधन झाले. त्यानंतर रवींद्र मिर्लेकर, अरविंद सावंत, विशाखा राऊत, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, २०२१ मध्ये अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मालमत्ता पत्रकावर चढवत, आजीवन विश्वस्त म्हणून धर्मादाय आयुक्तांच्या नोंदणी कार्यालयातील दस्तावेजात त्यांचे नाव जोडण्यात आले. त्यामुळे शिवाई ट्रस्टमधील इतर सदस्य केवळ नावापुरते असून, शिवसेना भवनाचा ताबा (मालकी) हा उद्धव ठाकरे यांच्याकडे असल्याचे कागदोपत्री स्पष्ट होत आहे.
(हेही वाचा – आता शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन नव्हे, ठाण्यातील ‘आनंदाश्रम’)
‘त्या’ नेत्यांना कुणी बाजुला केले?
‘शिवसेना भवन’ हे शिवाई ट्रस्टच्या माध्यमातून उभारले गेले असले, तरी बाळासाहेबांनी नेमलेल्या अनेक नेत्यांना या ट्रस्टमधून बाजूला करण्यात आले आहे. बाळासाहेबांनी हयात स्वतःचे नाव शिवाई ट्रस्ट वा शिवसेना भवनाशी संबंधित एकाही कागदपत्रावर चढवले नाही. नेहमी कार्यकर्त्यांना संधी दिली. मात्र, त्यांच्या सुपूत्राने स्वतःला आजीव विश्वस्तपदी नेमून इतरांवर अविश्वास दाखवल्याची टीका शिवसैनिकांकडूनच होऊ लागली आहे.
Join Our WhatsApp Community