लसीकरण केंद्र उभारणीत शिवसेना-भाजप नगरसेवकच आघाडीवर!

108

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर, आता प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, आतापर्यंत नगरसेवकांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आलेल्या आणि प्रस्तावित लसीकरण केंद्रांच्या उभारणीत शिवसेना आणि भाजप नगरसेवकच आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. पण काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये तेवढी उत्सुकता दिसून येत नाही.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरसेवकांची मागणी

मुंबईत लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेच्यावतीने प्रारंभी १९ केंद्रे सुरु करण्यात आली. त्यानंतर आता महापालिकेच्या ३९, राज्य व केंद्र सरकारी रुग्णालयांमधील १७ आणि ७३ खाजगी रुगणालयांमधील केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. मंगळवारी २० एप्रिलपर्यंत २० लाख ४३ हजार ८९८ जणांचे लसीकरण पार पडले. मात्र, सध्याची लसीकरण केंद्रं ही लांब अंतरावर असल्याने आपल्या प्रभागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता, नगरसेवकांकडूनच आता लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. यासाठी नगरसेवकांकडून आरोग्य विभागाला प्रस्ताव सादर केले जात आहेत. मात्र लसीकरण केंद्रात एका आयसीयू बेडची आवश्यकता असल्याने जवळच रुग्णालय असल्यास, त्यांच्या रुग्णालयाला संलग्न करुन लसीकरण केंद्र शालेय इमारत किंवा महापालिकेच्या इमारतीत सुरू केले जात आहे.

(हेही वाचाः आता डॉक्टर- नगरसेवकांमध्ये होऊ लागली ‘तू तू- मैं मैं’!)

या नगरसेवकांनी सुरू केले प्रभागात लसीकरण

आतापर्यंत शिवसेनेचे सचिन पडवळ, अमेय घोले, माधुरी भोईर तर भाजपचे प्रभाकर शिंदे, समिता कांबळे, याोगिता कोळी यांच्या प्रयत्नाने त्यांच्या प्रभागात लसीकरण केंद्रं सुरी झाली आहेत. मुलुंडमधील भाजपचे निल सोमय्या, भांडुप-कांजूरमार्ग मधील भाजप नगरसेविका सारिका मंगेश पवार, भांडुपच्या भाजप नगरसेविका जागृती पाटील, कांजूरमार्ग मधील शिवसेना नगरसेविका सुवर्णा करंजे आदी नगरसेवकांनी लसीकरणाचे प्रस्ताव प्रशासनाला सादर केले असून, त्यानुसार लसीकरण केंद्रं सुरू करण्याची कार्यवाही होत आहे.

वडाळ्यातील अॅक्वर्थ रुग्णलयातील लसीकरण सुरू

वडाळ्यातील अॅक्वर्थ रुग्णालय परिसरातील जागेत स्थानिक शिवसेना नगरसेवक अमेय घोले आणि एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र उभारले गेले आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन पर्यावरण मंत्री व पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रं लवकरात लवकर सुरू करावीत, असे निर्देश प्रशासनाला दिले. याठिकाणी प्रतिदिन ४००पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून वडाळा पूर्व, वडाळा पश्चिम आणि माटुंगा परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

(हेही वाचाः दुसरी लाट, पण प्रशासनाला का नको नगरसेवकांची मदत?)

नगरसेवक आणि त्यांच्या प्रयत्नाने सुरु झालेले व प्रस्तावित लसीकरण केंद्र

सचिन पडवळ(शिवसेना) : गांधी रुग्णालय, परेल

प्रभाकर शिंदे (भाजप) : मुलुंड मिठानगर महापालिका शाळा

समिता कांबळे (भाजप) : मुलुंड पी.के.रोड महापालिका शाळा

योगिता कोळी (भाजप) : मालाड चौक्शी प्रसुतीगृह

निल सोमय्या (भाजप) : मुलुंड कॉलनी लसीकरण केंद्र (प्रस्तावित)

माधुरी भोईर (शिवसेना) : आकृती मेटरनिटी होम,ठाकूर व्हिलेज,कांदिवली

ज्योती अळवणी (भाजप) : विलेपार्ले शिरोडकर रुग्णालय

सारीका पवार (भाजप) : भांडुप पूर्व महापालिका शाळा, कांजूरपूर्व महापालिका शाळा(प्रस्तावित)

जागृती पाटील (भाजप) : शिवदर्शन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संक्रमण शिबिराची जागा(प्रस्तावित)

सुवर्णा करंजे (शिवसेना) : परिवार सोसायटी कांजूरमार्ग(प्रस्तावित)

अमेय घोले (शिवसेना) : अॅक्वर्थ रुग्णालय, वडाळा

मनोज कोटक (भाजप): मुलुंड ई.एस.आय.सी. रुग्णालय आणि सीजीएचएस दवाखाना, नेव्हल हॉस्पिटल, कांजूरमार्ग वेस्ट (प्रस्तावित)

राखी जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस): घाटकोपर पूर्व गणेश नगर आरोग्य केंद्र

प्रिती सातम ( भाजप): गोकुळधाम प्रसूतीगृह

डॉ.अर्चना भालेराव(शिवसेना): घाटकोपर मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतीगृह

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.