मातोश्रीवर सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना खासदारांची बैठक झाली. यावेळी राज्यातील १८ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार केवळ उपस्थितीत होते. तर ६ खासदारांनी या बैठकीला पाठ फिरवली. मात्र या झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंना स्वीकारण्याच्या मागणीसह नैसर्गिक युती करा, अशी चर्चा झाल्याचे नाशिकमधील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. तर शिवसेनेचे लोकसभेतील काही खासदार भाजपशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसतेय. यावर बोलताना हेमंत गोडसे म्हणाले, सेना-भाजपातील नैसर्गिक युती व्हावी, त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी.
(हेही वाचा – RBI ने ‘या’ तीन बँकांना ठोठावला दंड; यामध्ये तुमचे अकाऊंट तर नाही ना?)
काय म्हणाले खासदार गोडसे
माध्यमांशी बोलताना पुढे गोडसे असेही म्हणाले की, भाजप सोबत असल्याचा २५ वर्षांचा युतीचा अनुभव आणि महाविकास आघाडीसोबत असल्याचा अडीच वर्षांचा अनुभव बघता, युतीकडे जावे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवाद साधून काही मार्ग निघतो का हे पाहवं, असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केल्याचे गोडसे म्हणाले.
जर भाजप-शिवसेनाची युती झाली तर…
भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती झाल्यास अनेक विकास कामे मार्गी लागतील, असं मतही हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले. युतीबाबत आम्ही आमचं मत पक्षप्रमुखांसोबत मांडलं आहे. आता ते त्यावर सकारात्मक भूमिका घेतील, अशी अपेक्षा हेमंत गोडसे यांनी व्यक्त केली आहे.