…अन् मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेनंच घातला बहिष्कार!

124

अलिबाग-उसर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतानाही जिल्ह्यातील आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे. यामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी चव्हाट्यावर आणली. त्याचवेळी ठाकरे यांनी मात्र ही मोहीम उघडणाऱ्यांची दखल न घेता पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक करत पक्षातील तिन्ही बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

(हेही वाचा- आदित्य ठाकरेंमुळे राज्यातील पर्यटनक्षेत्र असे बहरले!)

पालकमंत्री हटाव मोहीम सुरू

ज्या कार्यक्रमांना पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे असतील, त्या कार्यक्रमांना जिल्ह्यातील शिवसैनिक जाणार नाहीत, असे अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी आधीच घोषित केले होते. आदिती कोणालाच विश्वासात घेत नाहीत, कामात सातत्याने लुडबुड करतात. त्यामुळे शिवसेनेत असलेली नाराजी काही दिवसांपूर्वी बाहेर पडली. पक्षाचे आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री हटाव मोहीम सुरू केली.

दांडी मारत मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावर पक्षाने काहीही निर्णय घेतला नसल्याने जिल्हा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला तिन्ही आमदारांसह कार्यकर्त्यांनी दांडी मारत मुख्यमंत्र्यांनाच कोंडीत पकडले. ठाकरे यांनी ऑनलाइन उपस्थित राहात पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कामाची प्रशंसा केली. काम पूर्णत्वास नेणे ही आदिती तटकरे यांची खासियत आहे. अमुक काम करा, तमुक काम करा असे सर्वच सांगतात; परंतु त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पाडले, अशा शब्दांत स्तुती करत त्यांनी शिवसेनेच्या आमदारांना इशाराच दिल्याचे मानले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होत असताना ३५ दिवसांपासून सर्व वैद्यकीय शिक्षक मागण्यांसाठी आणि न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने आणि सचिवांच्या भूमिकेमुळे नाराज डॉक्टरांनी या कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ७६ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.