एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडीची राज्यातील सत्ता गेली. मात्र सोबतच शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. सध्या शिंदे गटाकडे एकूण 40 आमदार आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ 15 आमदार राहिले आहेत. त्यामुळे पुन्हा पक्ष उभा करण्याचे मोठे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. यासाठी त्यांनी तयारीही सुरु केली आहे. जिल्हा पातळीवर ते पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मंगळवारी, ५ जुलै रोजी त्यांनी हिंगोलीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधत, ‘सगळे सोबत आहेत ना रे बाबा’, असा प्रश्न सर्वांना विचारला.
हिंगोलीत शिवसैनिकांशी संवाद
हिंगोलीतील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन करून संवाद साधला. हिंगोलीतील शिवसेनेचे एकमेव आमदार संतोष बांगर हे सोमवारी, ४ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. यानंतर मंगळवारी दुपारी हिंगोलीत शिवसैनिकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ही बैठक सुरू असतानाच आनंदराव जाधव यांच्या फोनवर उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी बैठकीतील शिवसैनिकांशी संवाद साधला. ‘सगळे सोबत आहेत ना रे बाबा. शिवसैनिकांनो मला चिंता नाही कोण आले, कोण गेले. मी लढणार तुम्हा सर्वांची साथ आहे. त्यामुळे पुन्हा नव्या दमाने शिवसेना उभी करणार. लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे’, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community